माजी सैनिकांना महापालिकेचा दिलासा
: मिळणार करसवलत
पुणे –राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेकडून माजी सैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेअंतर्गत मिळकतकरात सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी, संबंधित मिळकतधारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ 1 ऑक्टोबर 2020 पासून देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्यसभेने या ठरावास मान्यता देताना सरसकट कर माफ करण्याचा निर्णय घेतला असला तरी, ते शक्य नसल्याने शासनाचे कर वगळून काही ठराविक करांमध्येच ही सवलत दिली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाने 1 ऑक्टोबर 2020 ला हा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयास महापालिकेची तसेच स्थायी समितीची मान्यता मिळण्यास विलंब झाल्याने तो अद्याप शहरातील माजी सैनिकांसाठी लागू करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर, स्थायी समिती आणि मुख्यसभेने मान्यता देताना माजी सैनिकांच्या मिळकतींना सरसकट मान्यता देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पालिकेच्या मिळकतकरात काही कर हे राज्य शासनाचे असल्याने त्यावर महापालिकेस सवलत देता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. त्यावर माजी सैनिकांकडून नाराजीही व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकांकडून माहिती मागवून त्या धर्तीवर या सवलतीचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, माजी सैनिकांच्या मिळकतींना सर्वसाधारण कर, सफाई कर, जल लाभ कर, पथ कर, महापालिका शिक्षण उपकर, तसेच जल निसा:रण करात सूट देण्यात येणार आहे.
कागदपत्रे महापालिकेस सादर करण्याचे आवाहन
हे असतील नियम
*माजी सैनिकांना लेखी अर्ज करून करसवलतीची मागणी करावी लागणार
*जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयाकडील पत्र, ओखळपत्राची प्रत
*माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, पत्नी हे निवृत्ती वेतनधारक असावेत
*या योजनेचा लाभ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, पत्नी हे हयात असेपर्यंत राहील
COMMENTS