पुणे: पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 15 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.
स्वर्गीय पुरंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते
त्याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची अनन्य भक्ती केली. त्यांच्या लेखणीचा, व्याख्यानांचा, महानाट्याचा आणि एकूणच जगण्याचा विषय शिवरायच होते. त्यांनी लेखन, वक्तृत्त्व, नाटके, गडकोट मोहिमा या सर्व माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरात शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास साध्या आणि सोप्या भाषेत घराघरात पोहोचवला, मनामनात रुजवला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे शिवरायांच्या पालखुणा आहेत त्या साऱ्या गडकोटांवर आणि ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन आणि तिथला इतिहास जागवून ते नतमस्तक झाले.
बाबासाहेबांच्या जाण्याने इतिहास आणि साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. आज ते देहरुपाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यारूपाने ते भावी पिढ्यांना शिवरायांचा इतिहास सांगत कायमच प्रेरणा देत राहतील. पुणे महानगरपालिकाही वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृती यथोचित जपण्याचे काम नक्कीच करेल. त्यांना समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली’.
मुरलीधर मोहोळ,
महापौर, पुणे
——–
शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या लेखणीतून मराठी मनामनात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. भावपूर्ण श्रद्धांजली!
दिपाली प्रदीप धुमाळ.
विरोधीपक्ष नेत्या पुणे मनपा.
—–
‘शिवचरित्र’ घरोघरी पोहचविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. शिवप्रेम म्हणजे काय, हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनमाणसात पोहचविले. शिवरायांच्या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी अनेक गडकिल्ले पालथे घातले. महाराजांची माहिती, संदर्भ, याचा अभ्यास तसेच संशोधन करून शिवशाहिरांनी केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगामध्ये शिवाजी महाराजांची किर्ती पोहचविली. असा शिवभक्त पुन्हा होणे नाही.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
महाराष्ट्र भूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे इतिहासाचे एक पर्व संपले. जाणता राजाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र पोहचवले. बाबासाहेबांनी महाराष्ट्रात दोन पिढ्या घडवल्या संपूर्ण जीवन त्यांनी शिवचरित्राच्या प्रसारासाठीच व्यतिथ केले. मी आयोजित करत असलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सव या गेली 27 वर्षे साजरे करीत असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात ते अनेक वर्षे अनेक कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवातही त्यांचा महर्षी पुरस्कार देऊन गौरव केला होता. आपल्या विषयातून सर्वच काही चांगले घडत राहावे ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे या त्यांच्या उदगारामुळे सगळेच अंतर्मुख झाले होते. त्यांच्या सारखा व्यासंगी पुन्हा निर्माण होणे शक्य नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील एक मोठा दुवा निखळला ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
COMMENTS