महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा
| ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम
गेल्या वर्षभरापासून बंद असलेला महापौर बंगला (Mayor Bungalow) आणि आयुक्त बंगल्याच्या (PMC Commissioner Bungalow) स्वच्छतेसाठी 24 लाख 59 हजाराची सामग्री खरेदी करण्यात आली आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शहनिशा न करताच या सामग्रीची भांडार विभागाकडून खरेदी करून घेतली आहे. असे बोलले जात होते. याबाबत ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने सर्वप्रथम वृत्त प्रसारित केले होते. याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. आयुक्तांनी या संबंधित सर्व खात्याकडून याचा खुलासा मागवला आहे.
महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याची स्वच्छता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते. त्यासाठी भांडार विभागाकडून विविध सामग्रीची खरेदी केली जाते. महापौर बंगला जो मागील वर्षांपासून बंद आहे आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 2022-23 या सालासाठी स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध 30 साहित्याचा समावेश आहे. ज्यामध्ये सुगंधी तेल, ब्लॅक फिनेल, डांबर गोळी, फ्लोअर क्लिनर, कमोड घासण्याचा ब्रश, काच पुसण्याची नॅपकिन, चहाचा कप, चहा ट्रे, रूम फ्रेशनर, अशी विविध साहित्ये आहेत. ही खरेदी भांडार विभागाकडून करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार भांडार विभागाने टेंडर प्रक्रिया राबवत ही खरेदी केली. कल्पक इंटरप्रायजेस या कंपनीला हे काम देण्यात आले. ज्यासाठी 24 लाख 59 हजाराचा खर्च करण्यात आला आहे.
मात्र दोन बंगल्या साठी एवढा खर्च होऊ शकतो का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे मग या बाबीची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाही दखल घेतली आहे. आयुक्तांनी याबाबत संबंधित अतिरिक्त आयुक्त, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय आणि आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी यांच्याकडून खुलासा मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालयाने याबाबत आयुक्त कार्यालय यांच्याकडे बोट दाखवले आहे. आता आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर सर्व गोष्टी समोर येणार आहेत.