मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन | कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेण्याचे मनपा प्रशासनाचे आश्वासन
पुणे:- महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनाला पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य खाते, स्मशानभूमी कर्मचारी, कचरा वाहतूक चालक, पाणीपुरवठा व इतर अनेक विभागातील कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
त्यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना कामगार नेते सुनील शिंदे म्हणाले, पुणे महानगरपालिकेतील कायम कामगारांना 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुगृह अनुदान त्याच बरोबर वीस हजार रुपये अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. परंतु त्याचबरोबर कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कंत्राटी कामगार यांना मात्र काहीच देण्यात आलेले नाही. हा मनपा मधील कांत्राटी कामगारांवर खूप मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कामगारांनाही बोनस व इतर लाभ मिळवून देण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर या कंत्राटी कामगारांचे इतर अनेक एक प्रश्न आहेत तेही यावेळी उपस्थित करण्यात आले.
मागण्यांचे निवेदन महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चा मध्ये शिवाजी दौंडकर यांनी कामगारांचा उर्वरित पगार दिवाळीपूर्वी करण्याचा इरादा जाहीर केला. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत माननीय आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सुरक्षा रक्षक प्रतिनिधी, विजय पांडव, जानवी दिघे, वेहिकल डेपोचे संदीप पाटोळे पाणीपुरवठा विभागाचे योगेश मोरे सोमनाथ चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.