चार धरणामध्ये 50% हून अधिक पाणीसाठा
| पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव आणि पानशेत ही दोन मोठी धरणे शुक्रवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला ४७०८ क्युसेकचा विसर्ग शुक्रवारी कायम ठेवण्यात आला.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणात सध्या १५.९४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५४.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये १.२६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमधील पाणीसाठा १४.६८ टीएमसी होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये तब्बल ६.५८ टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ४७०८ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत असून शुक्रवारी दिवसभर हा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.