छद्मविज्ञानाच्या पराभवासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक
– मच्छिन्द्रनाथ मुंडे यांचे प्रतिपादन
– महाराष्ट्र अंनिसचे चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण
पुणे : विज्ञानाचा आधार असल्याचे सांगून अनेक गोष्टी लोकांवर बिंबविल्या जातात. मात्र त्याला विज्ञानाचा आधार नसून ते छद्मविज्ञान असते. छद्मविज्ञानाचा पराभव करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी मच्छिन्द्रनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने ‘चमत्कार प्रशिक्षण’ आयोजित केले होते. प्रशिक्षणप्रसंगी मुंडे बोलत होते. कागदात असलेले तथाकथित भूत जाळून चमत्कार प्रशिक्षणाचे उदघाटन महाराष्ट्र अंनिसच्या विज्ञान बोध वाहिनीचे राज्य कार्यवाह भास्कर सदाकळे यांनी केले. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला. प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदाकळे यांनी चमत्कारांचे सादरीकरण अत्यंत रंजकपद्धतीने करून दाखविले. चमत्कारामागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखी, रासायनिक घटकांचा वापर, सादरीकरणातील सफाईदारपणा मुंडे यांनी सांगितला.
डोळ्यांवर कापड बांधूनही वाचता येणे अर्थात ‘मिडब्रेन’, ‘ग्रहणात शिजवलेल्या अन्नावर अनिष्ट परिणाम होतो’, ‘चुंबकांच्या वापराने कर्करोग, मधुमेह कसा समूळ बरा होतो’ असे चमत्काराचे दावे करून छद्मविज्ञान बिबवले जात आहे. मात्र विज्ञानाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्यास छद्मविज्ञान खोटे पडते, असे मुंडे यांनी सांगितले.
आजूबाजूला लहान घडलेली घटना ही दुसऱ्यापर्यंत पोहोचताना मोठ्या स्वरूपात सांगितली जाते. त्यामुळे चुकीची माहिती व गैरसमज पसरतात. लहान बुवाबाजी करणारा ढोंगीबाबा असेल तर त्याला मोठे करण्याचे काम काही जण करत असतात. चमत्काराला नमस्कार करून लोक फसतात आणि त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सुरू होते. त्यामुळे चमत्कारी गोष्टीना विरोध करून वास्तविक गोष्टीची कास धरण्याची गरज आहे, असे मत भास्कर सदाकळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंनिसच्या थॉट विथ ऍक्शन जर्नलचे संपादक हर्षदकुमार मुंगे यांनी प्रास्ताविक केले. शाखा सचिव घनश्याम येणगे, शाखा सहसचिव अरिहंत अनामिका यांनी सुत्रसंचलन केले. माधुरी गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मयूर पटारे, वनिता फाळके, विनोद खरटमोल यांनी गाणी सादर केली. ओंकार बोनाईत आणि सागर तुपे यांनी मनोगत व्यक्त केले. सोशल मीडिया विभागाचे राज्य सहकार्यवाह रविराज थोरात यांनी आभार व्यक्त केले.