मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| मुंबई समाचार वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित
मुंबई | गेल्या २ वर्षात कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वच भाषेतल्या पत्रकारांनी, दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. भारतातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱ्या काळात सुद्धा वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल अशी अपेक्षा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच्या काळात मराठी आणि गुजराती एकमेकांमध्ये दुधात साखरेप्रमाणे विरघळून गेले आहेत, त्यामुळे मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे हीच माझी सदिच्छा आहे असेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
भारतातील सर्वांत जुने वर्तमानपत्र अशी ओळख असणाऱ्या मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडला. द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासह मुंबई समाचार वृत्तपत्राचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.
मुंबई समाचार वृत्तपत्राचे अभिनंदन करून मोदी आपल्या भाषणात म्हणाले, महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आहे. भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी वृत्तपत्राचे उद्दिष्ट राष्ट्रीयत्व जपणे हेच होते. मुंबई समाचार केवळ बातम्यांचे माध्यम नाही तर तो एक समाजाचा वारसा आहे.मुंबई समाचार वृत्तपत्रातून भारताचे दर्शन घडते.अनेक संकटाना तोंड देत भारत कशा प्रकारे अढळ राहिला, याचे दर्शन आपल्याला मुंबई समाचारमधूनही मिळते. येणाऱ्या काळात मुंबई समाचार आपली ही परंपरा टिकवून ठेवेल असा विश्वास वाटतो.समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या देण्याचे, बातम्यांमधून लोकशिक्षण करण्याचे, समाज आणि सरकारमध्ये काही उणीवा असतील तर त्या वाचकांसमोर आणण्याचे काम वृत्तपत्रांचे आणि प्रसारमाध्यमांचे आहे.
गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत असलेले मुंबई समाचार हे एक गुजराती वृत्तपत्र असले तरी सर्वसामान्य वाचकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे याचा आनंद आहे. मुंबई समाचारने स्वातंत्र्यचळवळीला आवाज दिला आणि नंतर स्वतंत्र भारताची प्रगती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली;भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुंबई समाचार वृत्तपत्राची २०० वर्षे एकाच वर्षी साजरा होणे हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई समाचार वृत्तपत्राने आपला इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर आणावा जेणेकरून आजच्या पिढीला भारताचा इतिहास समजण्यास मदत होईल, असेही श्री. मोदी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
मुंबई समाचार वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे.मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा.
आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे कठीण आहे.वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे.काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहेत.मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की,सर्वात जुने वर्तमानपत्र अशी ओळख असलेले मुंबई समाचार २०० व्या वर्षात पर्दापण करीत आहे.१८२२ मध्ये बॉम्बे समाचार या नावाने साप्ताहिक पेपर म्हणून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती.दक्षिण मुंबईतील फोर्ट संकुलाच्या मध्यभागी असलेल्या रेड हाऊस नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र अथा्र्त मुंबई समाचार २०० वर्षाचा टप्पा गाठत आहे.
सलग २०० वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचारच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका स्मृती तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.