मोदी सरकारच्या दडपशाहीला पुण्यातून महाविकास आघाडीचा विरोध
पुणे : केंद्र सरकारने (Central Government) ई.डी. (ED) च्या मार्फत महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सूडापोटी अटक केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने ए. डी. कॅम्प चौक, नाना पेठ, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोदी सरकारच्या (Modi Government) दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी मंत्र्यांना अटक करीत आहे. ई. डी., सी. बी. आय., इन्कम टॅक्स यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दडपशाही आणून भितीचे वातावरण निर्माण करीत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वारंवार केंद्रातील मोदी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. अशाच प्रकारे अल्पसंख्यांकावर अत्याचार करण्याचा मोदी सरकारने विडा उचलेला आहे. हाथरस आणि उन्नाव येथे सुध्दा दलित महिलांवर अत्याचार झाले. तेथील भाजप सरकारने या प्रकरणावर सुरूवातील कानाडोळा केला आणि नंतर जनतेच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई केली. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ शकले नाही याचा राग केंद्र सरकारला आहे. अशा प्रकारे मंत्र्यांना अटक करून महाराष्ट्रातील सरकारला पाडण्यासाठी कट रचत आहे.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारचे ई.डी. खाते हे मोदी सरकारचे हस्तक म्हणून काम करीत आहे. अनेकांना चौकशीसाठी बोलावून त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मानसिक त्रास द्यायचे काम ई.डी. खाते करीत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ई.डी. ऑफिसमध्ये बसून महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात कट रचतात आणि त्याची अंमलबजावणी ई.डी. खाते करीत आहे. देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा कारभार कोणत्याही सरकारने केलेला नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यावर सूडापोटी देशातील विरोधकांच्या मुसकट दाबण्यासाठी सी. बी. आय., ई.डी. मार्फत कारवाया करीत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध करतो.
शिवसेना प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने या देशात अघोषित आणीबाणी आणली आहे. आपल्या राजकीय विरोधकांचा ई.डी., सी.बी.आय. मार्फत चौकशी लावून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना बदनाम करण्याचे काम करीत आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहे. या मुळ विषयांवरून लोकांची दिशाभुल करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करीत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ई. डी. ने व सी.बी.आय. ने गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे अनंतराव अडसुळ, प्रताप सरनाईक व भावना गवळी यांच्यावर सुध्दा ई.डी. ने कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अतिशय खंबीरपणाने राज्याचा कारभार सांभाळत आहे. किरीट सोमय्या हा भाजपाचा मोहरा आहे. आपली सत्ता येवू शकली नाही म्हणून सूडभावनेने महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे. जर केंद्र सरकारने अशा पध्दतीने कारवाई सुरू ठेवली तर शिवसैनिक आपल्या पध्दतीने त्यांना उत्तर देतील.’’
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, जयदेव गायकवाड, अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, अविनाश बागवे, रफिक शेख, पल्लवी जावळे, प्रदिप देशमुख, विशाल मलके, शिलार रतनगिरी, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल घाडगे, राहुल तायडे, विनय ढेरे, विवियन केदारी, मेहबुब नदाफ, रजनी त्रिभुवन, सुरेखा खंडागळे, अनुसया गायकवाड, जावेद खान, जुबेर शेख, भोलासिंग अरोरा, मुन्नाभाई शेख, मीरा शिंदे, अभिजीत महामुनी, बंडू नलावडे, सुमित डांगी, राधिका मखामले, कल्पना उनवने, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS