महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा
| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
महाराष्ट्र शासनाच्यावतीने (Maharashtra Government) देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची (Maharashtra Bhushan Award) रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होती, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याच ठरले. तसेच पुरस्कारच्या रक्कमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात दहा लाख रुपये देण्यात येत होते. या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून ती २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश देण्यात आले. (Maharashtra Bhushan Award)