किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण : महापौरांनी आयुक्तांना मागितला खुलासा
पुणे : महापालिकेत जंबो कोविड सेंटर बाबत तक्रार करण्यासाठी आलेल्या भाजप नेता किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. याबाबत राज्यभरात भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शांत राहणे पसंत केले होते. मात्र आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र धाडत सुरक्षा व्यवस्था आणि एकूणच प्रकाराबाबत लेखी खुलासा मागितला आहे. स्वतः किरीट सोमय्या यांनी हे पत्र ट्विट देखील केले आहे.
: काय आहे महापौरांचे पत्र
शनिवार, दि. ०५/०२/२०२२ रोजी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेस भेट देणेकामी आले असता त्यांना पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांमार्फत धक्काबुक्की करण्यात आली. सदर बाब ही अत्यंत गंभीर असल्याने या प्रसंगामुळे पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. किरीट सोमय्या, खासदार यांच्या दौऱ्याबाबत पुणे महानगरपालिकेस अवगत करण्यात आले असतानादेखील योग्य ती सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही? तसेच शनिवार, दि. ५/२/२०२२ या दिवशी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतानादेखील त्या वेळेत उपस्थित शिवसैनिकांस पुणे महानगरपालिकेच्या आवारत प्रवेश कसा मिळाला अथवा कोणी दिला? आपल्या सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटीबाबत आपणामार्फत माननीयांस का अवगत करण्यात आले नाही? याबाबत सर्व प्रश्नांचा खुलासा आम्हांस लेखी स्वरुपात तात्काळ कळविण्यात यावा.
COMMENTS