Javed Akhtar | Shabana Azami | महिलेला स्वतंत्र विचार करू द्या , तिला सन्मानाची वागणूक द्या
Javed Akhtar | Shabana Azami | महिलांना कोणत्याही क्षेत्रात कमी न लेखता त्यांना बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक देण्याची गरज असून महिलांचे युग आले आहे, अशा शब्दात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आपले मत मांडले. प्रत्येक क्षेत्रात मोठमोठ्या पदावर त्या काम करू लागल्या आहेत. त्यांना आदर नाही, तर एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. शबाना आझमी (Sbabana Azami) यांनी यावेळी बोलताना महिला ही घरातील एक गरज आहे म्हणून न बघता ती एक स्वतंत्र व्यक्ती असून तिलाही स्वतंत्र विचार करू द्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Javed Akhtar | Shabana Azami)
महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान | शरद पवार
संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींना आज प्रख्यात लेखक आणि कवी जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सांगली येथील डॉ. सुनिता बोर्डे यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, सातारा येथील भारती नागेश स्वामी यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, पुणे येथील लक्ष्मी नारायणन यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, ठाणे येथील शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, नांदेड येथील राजश्री पाटील यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’ तर नाशिक येथील शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन्मानपत्र, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौझिया खान, सुरेखा ठाकरे, उषा दराडे, आशा मिरगे, अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप, विद्या चव्हाण, अजित निंबाळकर, सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, राजलक्ष्मी भोसले, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, कविता आल्हाट, लोचन शिवले, वासंती काकडे, आमदार, राज्यातील चव्हाण सेंटरचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेल्या महिला भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना राज्यात महिला धोरण आणताना झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्या सर्वांवर मात करत महिला धोरण कसे लागू केले आणि हळूहळू त्यांचा तो निर्णय कसा लोकांना आवडू लागला यावर सविस्तर विवेचन केले. देशाचे संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलातही महिलांसाठी खास आरक्षण ठेवण्याची गरज आणि त्यानुसार नियोजन कसे केले. आणि आजमितीला संरक्षण दलात महिला अधिकारी कशा कामगिरी बजावत आहेत. हवाई दलातील अपघातांचे प्रमाण महिलांमुळेच कसे कमी झाले, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थी सहाही यशस्विनीनी यावेळी पुरस्काराप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच त्या त्या क्षेत्रात त्या करत असलेल्या कामांची माहिती दिली. सेंटरचे पुणे केंद्र सचिव अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. मनाली भिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
—-
News Title | Javed Akhtar Shabana Azami | Let the woman think independently, treat her with dignity