राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महागाईची होळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच ई.डी.सरकारच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी केली. “नोटबंदीची घोषणा करुन जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे महाराजा”, “सरकारी कंपन्या विकून जनतेचा रोजगार हिसकाविणाऱ्यांना शिक्षा दे रे महाराजा”, “जाती-धर्मात तेढ वाढवून राजकारण करणाऱ्यांना चोप दे रे महाराजा”, “सत्तेच्या धुंदीत बेताल वागणाऱ्यांना ताळ्यावर आण रे महाराजा “, “पेट्रोल-डिझेल-गॅस महाग करणाऱ्यांना बुद्धी दे महाराजा”, “शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणाऱ्याना अक्कल दे रे महाराजा” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य अन्याय अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळी च्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो वा राज्यातील शिंदे फडणवीस सरकार असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही, अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अष्ट प्रवृत्तींचा आम्ही दहन करत आहोत”. असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
सर्वच महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या बाबत अदानी- अंबानी यांसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या हातात खाजगीकरणाद्वारे देशाची सूत्रे दिल्याने मोठ्या प्रमाणात महागाईला सामोरे जावे लागत आहे. नुकतीच झालेली गॅस दरवाढ, सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ, सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला जी.एस.टी जीवनावश्यक वस्तू , गोळ्या औषधे यांवर देखील टॅक्स वाढवल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत आहेत. या सर्वांच्या विरोधात आज या प्रतीकात्मक होळीच्या आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे,डॉ. शंतनु जगदाळे,अनिता पवार,संतोष नांगरे दिपक कामठे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.