Everesting Competition | भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगडावर संपन्न
Sinhgadh Fort – (The Karbhari News Service) – किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, किल्ल्याला वेढून असलेल्या जंगल क्षेत्राचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणे, जबाबदार पर्यटनाचा विकास प्रोत्साहित करणे, किल्ल्याचे जतन आणि संरक्षण यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे उद्देशाने आयोजित भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगडावर नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेचे आयोजन सिंपल स्टेप्स फिटनेसने महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने केले होते. या स्पर्धेत पुण्यातून तसेच देशाच्या इतर भागातून आलेल्या उत्सुक खेळाडूंनी सहभाग घेतला. पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर येथे जेवण, स्वच्छतागृहे, आणि पायांची मालिश इत्यादी सुविधा स्पर्धकांना पुरवण्यात आल्या. एव्हरेस्टिंग हा शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम आहे. यामध्ये स्पर्धक एका डोंगरावर किंवा टेकडीवर लागोपाठ चढाई करून माउंट एव्हरेस्टच्या ८,८४८ मीटर उंचीइतकी चढाई पूर्ण करतात. एव्हरेस्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे संस्थापक अँडी व्हॅन बर्गन यांनी स्पर्धकांसाठी विशेष प्रोत्साहनपर व्हिडिओ संदेश पाठवला. तसेच, एकल (सोलो) पूर्ण आणि अर्ध (हाफ) एव्हरेस्टिंगच्या यशस्वी स्पर्धकांना एव्हरेस्टिंग हॉल ऑफ फेममध्ये आपले नाव सामील करण्याची संधीही दिली आहे.
या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या. एव्होस्टिंग सोलो (१६ फेल्या), एव्हरेस्टिंग टीम रिले (१६ फेऱ्या), हाफ एव्हरेस्टिंग सोलो (८ फेल्या), आणि हाफ एव्हरेस्टिंग टीम रिले (८ फेल्या), टीम रिले स्पर्धा भविष्यातील एकल आव्हानासाठी तयारी व सांघिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली. याशिवाय, उत्साही लोकांना सिंहगड किल्ल्याची चढाई व चांदण्यातली सौंदर्य अनुभवता यावे म्हणून फन रन या उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. शाळकरी विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील सुमारे ७५ स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला.
आत्मबोध वेलनेस सेंटर जवळील बलकवडे स्मारकापासून सर्व स्पर्धांचा आरंभ झाला. एव्हरेस्टिंग सोलो गटात, सात स्पर्धकांनी सुरुवात केली आणि त्यापैकी तीन जणांनी १६ फेऱ्या पूर्ण केल्या. अपूर्व मेहता यांनी ३९:०६:२० तासांत पुष्कराज कोरे यांनी ४३:११:५४ तासांत आणि मेधा जोग यांनी ४३:१२:२३ तासांत आव्हान पूर्ण केले.
हाफ एव्हरेस्टिंग गटात, सहा स्पर्धकांनी सुरुवात केली, त्यापैकी तीन जण यशस्वी ठरले. उमेश धोपेश्वरकर यांनी २१:००:३१ तासांत ८ फेल्या पूर्ण केल्या, उमेश कोंडे यांनी २१:०४:१६ तासांत आणि अपर्णा जोशी यांनी २४:३६:२४ तासांत हे आव्हान पूर्ण केले. किरण टीके, ज्यांनी अर्ध एव्होस्टिंग टीम रिले साठी नोंदणी केली होती, त्यांनी २१:११:३१ तासांत आव्हान एकल (सोलो) प्रकारे पूर्ण केले. तसेच, योगेश बडगुजर (१८:५६:४५) आणि सुधन्वा जातेगावकर (२०:४९:१४), हे पूर्ण एव्हड्रेस्टिंग गटातील स्पर्धक अनुक्रमे ९ आणि ८ फेल्या पूर्ण करून हाफ एव्हरेस्टिंगसाठी पात्र ठरले.
ही ऐतिहासिक स्पर्धा भारतातील खडतर, धाडसी प्रकारातल्या क्रीडांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. सिंपल स्टेप्स फिटनेसचे संस्थापक अशिष कासोदेकर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक लोकांना प्रेरणा देण्यासाठी आणि शारीरिक व मानसिक क्षमतेची किमया आजमावण्यासाठी या स्पर्धाद्वारे अधिकाधिक भारतीयांना व विशेष करून तरूण पिढीला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असल्याचे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांनी कळविले आहे.
COMMENTS