सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
पुणे | जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा शिथील करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत.
केंद्र शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे नियम निश्चित केलेले आहेत. श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. १९ फेब्रुवारी शिवजयंती, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २३, २४, २६ व २७ सप्टेंबर गणपती उत्सव, २८ सप्टेंबर ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी, २३ व २४ ऑक्टोबर नवरात्री उत्सव, १२ नोव्हेंबर दिपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस (नाताळ सण), ३१ डिसेंबर वर्षअखेर तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार उर्वरित २ दिवस परवानगी देण्यात येईल. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा, क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
000