पालिका निवडणुकींच्या बाबतीत शिंदे – फडणवीस सरकारचा पळपुटेपणा पुन्हा एकदा उघड | राष्ट्रवादीचा आरोप
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडली असून, त्याला केवळ महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारचा पळपुटेपणा जबाबदार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
राज्यातील १४ महानगरपालिका, २७ जिल्हापरिषद,३५०नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या सहा महिन्यांपासून स्थगित असून या निवडणुका तत्काळ घेण्यात येऊन राज्यातील सुमारे ११कोटी जनतेला हक्काचे लोकप्रतिनिधी मिळावे, यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी कामकाजाला सुरुवात झाली असता राज्य शासनाच्या वकिलांनी मुदतवाढ मागितल्याने पहिल्यांदा ५ आठवड्याची स्थगिती, त्यानंतर आज पुन्हा राज्य शासनाच्या वकिलांनी याबाबत मुदतवाढ मागितल्याने सुनावणी न होता हा निकाल सुमारे २ आठवडे लांबणीवर पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने सुमारे ६ महिनांपासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त आहेत.या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ १ प्रशासक सर्व लोकप्रतिनिधींच्या जागी कारभार पाहत असल्याने नागरिकांच्या स्वच्छ्ता,आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांसाठी हक्काचे लोकप्रतिनिधीच नाहीत. राज्यातील सुमारे ११ कोटी जनतेला त्यांच्या हक्काचे लोकप्रतिनिधी निवडता यावे, यासाठी निवडणुका घेण्याबाबत इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर असलेल्या या सुनावणीसाठी राज्य सरकार वकिलांद्वारे आपली भूमिका मांडू शकत नसतील तर शिंदे- फडणवीस सरकार लोकशाही मूल्य जपण्याबाबत किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट होते. तसेच या निवडणुका घेण्याबाबत शिंदे – फडणवीस सरकारच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती यातून स्पष्ट जाणवते.
राज्यात विश्वासघात करत, आमदार विकत घेऊन स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारला जनता येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नाकारणार ही भीती स्पष्ट जाणवत असल्यानेच शिंदे- फडणवीस सरकार अश्या प्रकारे वेळकाढूपणा करत आहे.
आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून पुढच्या सुनावणीच्या वेळी राज्यातील ११ कोटी जनतेला हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचाबाबतचा महत्त्वपूर्ण निकाल येईल व राज्यातील प्रशासकराज संपेल अशी आम्हाला खात्री असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.