President pune tour | देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान  | राष्ट्रपती राम नाथ कोविंद

HomeBreaking Newsपुणे

President pune tour | देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान | राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Ganesh Kumar Mule May 27, 2022 10:50 AM

Katraj-Kondhwa Road Pune |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांसाठी अजित पवार २०० कोटी मिळवून देणार का? | अजित पवारांनी पाहणीच्या वेळी दिले आश्वासन 
Ajit Pawar | फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा | उपमुख्यमंत्री अजित पवार
PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या घेण्याची आवश्यकता!

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान

| राष्ट्रपती राम नाथ कोविंद

| कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.
महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्थापित हिंदवी स्वराज्य, राज्यातील राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक परंपरांचा आढावा घेताना राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, महाराष्ट्र मध्यकाळापासूनच अग्रेसर राहिला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी आदींनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना किंवा मराठी सरदारांची अटकेपार स्वारी, याद्वारे विविधतेमध्ये एकतेचे अद्भुत उदाहरण मराठा सरदारांनी प्रस्तूत केले होते.
सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. देशात स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमितून शोषित, वंचितांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तीमत्व ठरले, असेही श्री. कोविंद यांनी नमूद केले.
*दगडूशेठ परिवाराचे योगदान*
श्री. कोविंद पुढे म्हणाले, दगडूशेठ हलवाई परिवारातर्फे स्थापिक गणपती मंदिराद्वारे स्व. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळक यांच्यासमवेत गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव इंग्रज सरकारविरोधात राष्ट्रवाद तसेच सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उदयास आला. या माध्यमातून दगडूशेठ परिवाराने देशाच्या राष्ट्रीय, राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.
सामाजिक तसेच धार्मिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून केलेल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याची माहिती मिळून आनंद झाल्याचे राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी सांगितले. निर्धन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनाथालये तसेच वृद्धाश्रमामध्ये मोफत जेवण आदी अनेक कल्याणकारी कार्य या ट्रस्टकडून केले जाते. कोविड काळात गरजूंना भोजन वितरण तसेच मुस्लिम बांधवांकडून आपल्या जीवाची पर्वा न गरता अनेक कोविडमुळे मृत्यू पावलेल्या हिंदू रुग्णांवर अंतिम संस्कार केल्याचे समजले. अशा कार्यामुळे सामाजिक सद्भावना आणि एकात्मतेला वृद्धी मिळते, असेही ते म्हणाले.
माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील म्हणाल्या, स्व. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई हलवाई हे परोपकारी आणि सधन दांपत्य होते. स्वातंत्र्यचळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेक महत्त्वाच्या बैठका त्यांच्या हवेलीमध्ये होत असत. त्यांनी स्थापन केलेले गणपती मंदिर प्रसिद्ध झाले असून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्टमार्फत ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत जेवण आदी अनेक समाजउपयोगी कार्ये केली जातात असे त्यांनी सांगितले.
*राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान*
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू आणि राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या अध्यक्षा व कार्यकारी संचालक डॉ. भाग्यश्री पी. पाटील, बोन्साय कला आणि पर्यावरण जागृती विषयात पहिली डॉक्टरेट केलेल्या डॉ. प्राजक्ता काळे यांना लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ॲड. प्रताप परदेशी यांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांच्याहस्ते ‘लक्ष्मी दत्त’ नावाच्या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करण्यात आले तसेच राष्ट्रपती श्री. कोविंद यांना या पुस्तिकेची प्रत प्रदान करण्यात आली. यावेळी श्रीमती प्रतिभा पाटील यांना 2021 मध्ये प्राप्त मेक्सिको देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांनी राष्ट्रपती श्री. कोविंद यांना राष्ट्रपती भवनच्या संग्रहालयात ठेवण्यासाठी सुपूर्द केला.
प्रारंभी दत्त मंदिराच्या आणि ट्रस्टच्या स्थापनेबाबतचा इतिहास, ट्रस्टमार्फत सुरू असलेले विविध उपक्रमांबाबत चित्रफीत दाखवण्यात आली.
ॲड. कदम जहागिरदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास दत्त मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0