चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार!
| महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात
पुणे | महापालिकेचा मिळकतकर विभागाच्या कर वसुलीला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे विभागाने आता काही कडक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चेक बाऊन्स झाला तर संबंधित प्रॉपर्टी धारकाची प्रॉपर्टी सील करण्यात येणार आहे. त्यानुसार कर संकलन विभागाने नागरिकांना नोटीस पाठवणे देखील सुरु केले आहे.
| विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली बैठक
महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1650 कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. या नागरिकांना अपेक्षित आहे कि पिंपरी च्या धर्तीवर पुण्यातही तीन पट कर माफ होईल. तसेच उरुळी आणि फुरसुंगी प्रमाणे आपली ही गावे महापालिका हद्दीतून वगळली जातील. शिवाय गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक कर भरण्याबाबत उदासीन दिसत आहेत. तसेच शहरातून देखील नागरिक कर भरताना दिसत नाहीत. कारण 40% कर माफीचा निर्णय अजून प्रलंबित आहे. याचा परिणाम टॅक्स विभागाच्या वसुलीवर होत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे नियोजन करण्यासाठी महापालिका वर्धापन दिनी म्हणजे बुधवारी विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात एक बैठक घेतली. त्यासाठी सगळे प्रशासन अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयातील सर्व निरीक्षकांना बोलावण्यात आले होते. सुट्टी असून देखील सर्व हजर होते.
टॅक्स भरणा करण्यासाठी नागरिक चेक चा उपयोग करतात. मात्र मोठ्या रकमेचे चेक बाऊन्स होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र तरीही नागरिक जुमानत नाहीत. त्यामुळे आता प्रॉपर्टी सील करण्याचे आदेश देशमुख यांनी विभागाला दिले आहेत. त्याआधी नोटीस दिली जाणार आहे. त्यानुसार आजपासून नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
– सोसायट्यांमध्ये मोहीम राबवली जाणार
दरम्यान शहरात बरेच नागरिक असे आहेत ज्यांनी टॅक्स भरणा केलेला नाही. त्यासाठी आता विभागाकडून मोठ्या सोसायट्याना टार्गेट केले जाणार आहे. त्यासाठी सोसायट्यामध्ये मोहीम राबवली जाणार आहे. ज्या नागरिकांचा टॅक्स भरणा थकीत आहे, अशा सोसायट्या शोधून महापालिका कर्मचारी तिथे जातील. तिथेच तात्काळ टॅक्स भरणा करून त्यांना पावती देखील देतील. यामुळे नागरिकांना टॅक्स भरणा करणे अनिवार्य राहणार आहे. अशीच मोहीम काही वर्षांपूर्वी विभागप्रमुख सुहास मापारी असताना राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर ही मोहीम राबवली जाईल. यातून महापालिकेला अपेक्षित वसुली होईल, असे मानले जात आहे.
| सोमवार, गुरुवार सोडून सर्व दिवस फिल्ड वर जावे लागणार
दरम्यान टॅक्स विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी फिल्ड वर जावे लागणार आहे. याबाबत ही बैठकीत चर्चा झाली. फक्त सोमवार आणि गुरुवारी कार्यालयात येण्याची अनुमती असेल. बाकी सर्व दिवस फिल्ड वर राहून वसुली करावी लागणार आहे. तसेच आगामी काळात विभागातील क्लेरिकल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील फिल्ड वर काम करावे लागणार आहे.