ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे अजितदादांकडून शिकण्यासारखे | प्रशांत जगताप
भारतीय राजकारणात जी प्रमुख राजकीय घराणी आहेत, त्या घराण्यांमध्ये पवार कुटुंबीयांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रामुख्याने राजकीय कुटुंब अथवा राजकीय वारसा याबाबत जेव्हा बोलले जाते त्यावेळी जवळपास सर्वच ठिकाणी मागच्या पिढीने केलेल्या कामात पुढच्या पिढीकडून वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. आदरणीय अजितदादा पवार मात्र या नेहमीच्या घराणी पद्धतीतील नेते नाहीत तर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि शिस्तप्रिय,प्रशासनावर मजबूत पकड असणारे,रोखठोक स्वभाव असणारे नेते हीच त्यांची कार्यशैली प्रसिद्ध झाली.
माझ्या राजकीय कारकीर्दीत माझे राजकीय आदर्श तथा श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब असले तरी माझे राजकीय गुरु हे अजितदादाच आहेत. कारण आयुष्यात किती उंचीपर्यंत जाण्याचे धेय्य ठेवायचं हे जरी पवार साहेबांनी शिकवले असलं तरी त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे मात्र अजितदादांकडून शिकण्यासारखे आहे.
माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच जसे मी दादांच्या जवळ गेलो तसे तसे दादांकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या.ज्यात ” कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर त्या गोष्टी त्या यंत्रणे कडून करून घेता येतात”, हे मी दादांकडून शिकलो.
साधारणतः राजकीय व्यक्ति नेहमी आपल्या मर्जीतील अधिकारी एखाद्या संस्थेत बसले पाहिजेत, आपल्याला अडचण होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत यासाठी आग्रही असतात. परंतु साधारण वीस वर्षांपूर्वी मी दादांजवळ असताना एक किस्सा जवळून पाहिला. बदलीसाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना दादांनी खडसावून सांगितले की, “जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यासोबतच जर तुम्ही व्यवस्थित संबंध जपले तर कुठल्याही अधिकाऱ्याची बदली करण्याची वेळ येत नाही. शिवाय जसे राजकीय लोकांचे एकमेकांसोबत संबंध असतात तसेच बदली होऊन जाणारे अधिकारी देखील पुढच्या अधिकाऱ्यांना सांगून जातो की, “ह्या ह्या व्यक्ती पासून सावध रहा”. त्यामुळे राजकीय आयुष्यात वाटचाल करत असताना जी प्रशासकीय यंत्रणा आहे तिच्यासोबत जर व्यवस्थित जुळवून घेतले तर ती यंत्रणा देखील तुमच्यासोबत उत्साहाने काम करू शकते. कुठलेही नियमबाह्य काम करण्यासाठी अधिकाऱ्यांवर कधीही दडपण दबाव आणू नये , अधिकाऱ्यांना देखील काम करण्याची उत्सुकता असते परंतु राजकीय उदासीनतेमुळे अधिकारी काम करू शकत नाहीत. त्यांना जर निपक्षपातीपणें काम करू दिले तर आपल्या भागाचा विकास हा निश्चित होतो”. हे एकच नाही तर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात आदरणीय दादांनी संबंध जपण्यापासून संबंध टिकवण्यापर्यंत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याचाच परिणाम म्हणून आज पुणे शहरात आम्ही दादांचे शिलेदार म्हणून अभिमानाने कुठल्याही कार्यालयात जाऊन लोकहिताची कामे करून घेऊ शकतो.
देशाच्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये तसेच राज्यांच्या विधिमंडळांमध्ये आजवर अनेक मातब्बर नेते होऊन गेले. त्यांनी आपापल्या परीने त्या त्यावेळेस त्यांचा काळ गाजवला , परंतु या सर्व नेत्यांमध्ये केवळ अजितदादा असे आहेत की, जे सकाळी सात वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात कामासाठी हजर असायचे. कित्येक कार्यक्रमांना अजितदादांनी सकाळी सहा- सात ची वेळ दिली आहे व त्यावेळी किंबहुना वेळेच्या पूर्वी दादा तिथे हजर असतात. स्वतः सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करणे, दिवसभराच्या आपल्या कामांमध्ये काहीही काम शिल्लक न ठेवणे ,ज्या कार्यक्रमात गेलो आहोत त्या कार्यक्रमात पूर्णपणे त्या त्या विषयावर सखोल माहिती देणे तिथल्या श्रोत्या वर्गाला उगीच काहीतरी भंपक आश्वासने देण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीशी निगडित संवाद साधने. आपल्या संकल्पना लोकांवर थोपवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय हवे आहे..? हे पाहत सुसंवादातून काम पूर्णत्वास घेऊन जाणे हे अजितदादांचे विशेष गुण. कार्यक्रमात आयोजकांना जर अजितदादांना बोलवायचे असेल तर इतर मान्यवरांपेक्षा अजितदादा येणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितच करावे लागते. याचे कारण म्हणजे दादा एखाद्या इमारतीच्या उद्घाटनास आल्यास त्या इमारतीच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून ते सजावटीपर्यंत कामाचा दर्जा, टेक्निकली मेजरमेंट, सजावट,रंगरंगोटी, नीटनेटकेपणा, स्वच्छता या सर्व बाबींमध्ये अजितदादा बारकाईने लक्ष देतात. विशेष म्हणजे यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आयोजकांच्या कानात सांगण्याची पद्धत दादांकडे नाही, दादा तिथे सगळ्यांसमोर त्या आयोजकास या चुकीबद्दल जाब विचारतात. कारण आपण लोकांच्या पैशातून काम करत असताना , तो निधी योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. त्या निधीतून उभ्या राहणाऱ्या वास्तू या वर्षानुवर्ष टिकल्या पाहिजे. लोकांचा पैसा हा जपून योग्य ठिकाणी वापरत लोकांना उच्च प्रतीच्या सोयी सुविधा निर्माण करून देणे हा देखील अजितदादांनी आम्हास घालून दिलेल्या शिस्तीचाच एक भाग आहे.
राज्याचा कारभार सांभाळत असताना पुणे शहरावर दादांचे विशेष लक्ष असते. दादा पुणे शहर व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणी वंचित राहिल्याची एकही घटना घडलेली नाही, याचे कारण म्हणजे दादा पालकमंत्री असताना सातत्याने दर आठवड्यात पुणे जिल्ह्यातील प्रशासनाची आढावा बैठक पार पडत असे. या बैठकीमुळे प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी असेल, प्रशासकीय पातळीवर काही निर्णय घ्यावयाचे असतील तर ते तात्काळ घेतले जाऊन पुढच्या आठवड्यात त्या निर्णयानच्या अंमलबजावणी मध्ये आलेल्या त्रुटी बाबत दादा आढावा घेत असे. यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील एक गोष्ट जाणून होते की दादांकडे कुठल्याही विभागाची तक्रार घेऊन नागरिक जाता कामा नये. प्रशासकीय यंत्रणा देखील पूर्ण ताकदीनिशी काम करत असे.
महानगरपालिकेत नव्याने गावे समाविष्ट करत असताना दादांनी स्पष्टपणे भूमिका मांडली होती की, कुठल्याही प्रकारे पुणे शहरालगतच्या परिसरात अनधिकृत बांधकामे वाढता कामा नये. शहरालगतची जी गावे आहेत तेथे बकाल वस्ती होऊ नये यासाठी दादांनी ती गावे महापालिकेत समाविष्ट करून घेतली. तत्कालीन भाजपला त्या गावात सोयी सुविधा देणे शक्य झाले नाही. तरीदेखील दादांचा मात्र हाच आग्रह होता की या गावांना महापालिकेचे सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. या गावांचा देखील सुनियोजित विकास झाला पाहिजे. पुण्याचा रिंग रोड प्रकल्प हा देखील दादांचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे केवळ पुणे शहरातून जाणाऱ्या हायवेमुळे पुणे शहर नागरिकांना रहदारीचा सामना करावा लागू नये तसेच पुण्यातील कुठल्याही भागातून शहराबाहेर पडायचे असल्यास एक ट्राफिक मुक्त महामार्ग असावा या संकल्पनेतूनच दादांनी रिंग रोड प्रकल्प आणला. उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला भरीव निधी देखील दिला. स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाला देखील दादांनी मंजुरी दिली. भामा – आसखेड प्रकल्प, एस.आर.ए प्रकल्पांच्या सदनिकांची साईज वाढवणे असे अनेक निर्णय दादांनी पुण्यासाठी घेतले.ज्याचे दीर्घकालीन परिणाम पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी भविष्यात दिसतील.
कोवीड च्या काळात ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेत होतो, त्याचप्रमाणे आदरणीय दादांनी पुणे शहर व जिल्ह्याची काळजी घेतली. अधिकाऱ्यांसोबत कायम सुसंवाद ठेवत जंबो कोवीड सेंटर, खाजगी रुग्णालय – शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराचा दर्जा वाढवत सोयी सुविधा निर्माण करणे. पुढच्या काही दिवसांचा विचार करत ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टी दादांनी अतिशय काळजीपूर्वक हाताळल्या.
आज दादांच्या ६३ व्यां वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे, तीच मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की , दादांना भविष्यात आम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहायचे आहे, त्यासाठी कार्यकर्ता म्हणून वाटेल ती मेहनत घ्यायची आमची तयारी आहे .
दादा औक्षवंत व्हा..!
– प्रशांत जगताप
(अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
महापौर २०१६-१७ )