हेमंत रासने यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती
| निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Byelection) भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातून त्यांच्याकडे जवळपास 17 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. त्यात जमीन विकत घेण्याकडे त्यांचा जास्त कल असल्याचे दिसून आले.
हेमंत रासने यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते स्वतः बांधकाम व्यवसायाचे काम करत असून तीन कंपन्यामध्ये भागीदार आहेत. तर त्यांच्या पत्नी या व्यवसाय तसेच शेती करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या बोरघर, टाळसुरे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील पोंभुर्ले तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील म्हाळुंगे आणि भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली येथे शेतजमीन आहे. हेमंत रासने आणि त्यांची पत्नी मृणाली रासने अशी दोघांच्या नावे २५ एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील सदाशिव पेठ येथे दोन फ्लॅट बुधवार पेठ येथे एक फ्लॅट देखील आहे.
हेमंत रासने यांनी आपले वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये रुपये तर पत्नी मृणाली ४ लाख ३० हजार ८३० रुपये इतके दाखवले आहे. तसेच हेमंत रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.