Good News for PMC Employees | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले जाणार ५ लाख!
| कामगार कल्याण विभागाच्या प्रस्तावाला धोरणात्मक मान्यता
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कामावर असताना कुठल्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कामगार कल्याण विभागाने ठेवलेल्या प्रस्तावाला नुकतीच धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्या प्रती महापालिकेचे असलेले उत्तरदायित्व लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा निर्णय मानला जात आहे. (PMC Labour Welfare Department)
पुणे महापालिकेत कामावर असताना दरवर्षी 100 ते 125 कर्मचारी आणि अधिकारी यांचा विविध कारणाने मृत्यू होतो. मात्र त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य करण्या बाबत कुठला धोरणात्मक निर्णय नव्हता. मनपा निधीतून आणि कामगार कल्याण निधीतून 75 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र या अर्थसहाय्यात वाढ करणे गरजेचे आहे हे कामगार कल्याण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे विभागाकडून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत स्थायी समिती च्या माध्यमातून मुख्य सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला शुक्रवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
दरम्यान यासाठी अर्थसंकल्प मध्ये 3 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. तसेच 5 लाखांचे अर्थसहाय्य दिल्यानंतर कामगार कल्याण निधी मार्फत 2 लाखांचे सहाय्य दिले जाणार नाही.
| आतापर्यंत अशा पद्धतीने करण्यात आले अर्थसहाय्य
2020-21 साली 122 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वारसांना 75 हजार प्रमाणे 90 लाखांचे अर्थसहाय देण्यात आले. 2021-22 ला 119 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 88 लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. 2022-23 साली 114 कर्मचाऱ्यांना 83 लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. 2023-24 साली 116 कर्मचाऱ्यांना 86 लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले. तर 2024-25 साली 115 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 85 लाख इतके अर्थसहाय्य करण्यात आले. हे अर्थसहाय्य मनपा निधी आणि कामगार कल्याण निधीच्या माध्यमातून देण्यात आले.

COMMENTS