Ganesh immersion tanks | PMC Pune | गणराया महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना सदबुद्धी दे | विवेक वेलणकर
| पुणेकरांचे दीड कोटी रुपये पाण्यात घालण्याचे टेंडर
Ganesh immersion tanks | PMC Pune | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी यंदा १५० फिरत्या गणेश विसर्जन हौदांसाठी (Ganesh immersion tanks) दीड कोटी रुपयांचे टेंडर काढायला सांगितले आहे. हे टेंडर तत्काळ रद्द होण्याची आवश्यकता आहे. आपण शहराच्या तिजोरीचे मालक नाही तर विश्वस्त आहोत ही जाणीव महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना व्हावी. अशी गणराया चरणी प्रार्थना विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केली आहे.
वेलणकर म्हणाले, २०१९ पर्यंत अनेक वर्षे महापालिकेने (Pune Municipal Corporation) गणेश विसर्जनासाठी (Ganesh Immersion) शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद , ३५९ लोखंडी टाक्या , १९१ मूर्ती संकलन / दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती. याशिवाय वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा आग्रह धरणारे लोक नदीत ही विसर्जन करत होते. ही सर्व विसर्जन यंत्रणा पुरेशी ठरत होती. २०२० साली करोना महामारी मुळे नागरीकांना या विसर्जन सोयी उपलब्ध नसल्याने शहरात ३० फिरते हौद महापालिका प्रशासनाने ठेवले व नागरीकांनी त्यामध्ये गणेश विसर्जन केले. २०२१ सालीही करोना महामारी मुळे नागरीकांना या विसर्जन सोयी उपलब्ध नसल्याने शहरात ६० फिरते हौद महापालिका प्रशासनाने ठेवले व नागरीकांनी त्यामध्ये गणेश विसर्जन केले. (PMC Pune)
वेलणकर पुढे म्हणाले, यंदा कोणतेही करोना निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद , ३५९ लोखंडी टाक्या , १९१ मूर्ती संकलन / दान केंद्रे अशी व्यवस्था उपलब्ध असणार आहे. याशिवाय वाॅर्ड स्तरावर सीएसआर , विविध संस्था व व्यक्ती स्वखर्चाने फिरते विसर्जन हौद उपलब्ध करत असतात. शिवाय वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा आग्रह धरणारे लोक नदीत ही विसर्जन करतील. मात्र तरीही याउप्पर महापालिका प्रशासनाने १५० फिरते विसर्जन हौद ही भाड्याने घेण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. म्हणजे विसर्जनाची अन्य कोणतीही व्यवस्था नसताना संपूर्ण शहरासाठी २०२० मध्ये ३० तर २०२१ मध्ये ६० फिरते विसर्जन हौद संपूर्ण शहरासाठी पुरले आणि यंदा विसर्जनाच्या अन्य मुबलक सोई उपलब्ध असताना १५० फिरते विसर्जन हौद भाड्याने घेण्याचा आणि त्यापोटी जनतेच्या करांचे दीड कोटी रुपये पाण्यात घालायची आवश्यकता काय ? (Pune Municipal Corporation)
वेलणकर म्हणाले, गेल्या वर्षीही ( २०२२) महापालिका आयुक्त व प्रशासनाने अट्टाहासाने १५० फिरते हौद भाड्याने घेतले होते. तेंव्हा विसर्जनासाठी आलेल्या ४,३०,०९१ पैकी जेमतेम १३% मूर्तींचे विसर्जन या फिरत्या हौदात झाले. मात्र महापालिकेने या स्वतः च्याच आकडेवारीवरून कोणताही बोध न घेता यंदा परत एकदा १५० विसर्जन हौद भाड्याने घेऊन नागरिकांच्या करांच्या दीड कोटी रुपयांचे विसर्जन करण्याचा घाट घातला आहे. सोमवारच्या माहिती अधिकार दिनात आज ही कागदपत्रे मिळाल्यावर धक्काच बसला. यामध्ये पाचवा दिवस ते अकरावा दिवस अशा फक्त सहा दिवसांसाठी ही व्यवस्था असणार आहे. सहावा , आठवा आणि नववा या तीन दिवशी अत्यंत कमी गणपतींचे विसर्जन होते. तरी हे दीडशे विसर्जन हौद ठेवले जाणार आहेत. गणपती उत्सव दहा दिवसांचा असताना अकराव्या दिवशी पण हे फिरते हौद असणार आहेत.
—-
हे टेंडर तत्काळ रद्द होण्याची आवश्यकता आहे आणि आपण शहराच्या तिजोरीचे मालक नाही तर विश्वस्त आहोत ही जाणीव महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना व्हावी हीच गणराया चरणी प्रार्थना
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे