उद्यापासून कंत्राटी कर्मचारी महापालिका गेटवर आमरण उपोषण करणार | सुनिल शिंदे
पुणे | महापालिकेत (PMC Pune) काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (contract Employees) समस्या तशाच आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उद्यापासून पुणे महापालिका गेटवर आमरण उपोषण (Hunger strike) करण्यात येणार आहे. अशी भूमिका राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे (RMS president Sunil Shinde) यांनी घेतली आहे.

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समस्या संदर्भात काँग्रेस भवन पुणे येथे बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजूनही जवळजवळ 200 सुरक्षारक्षकांना कामावर घेण्यात आलेले नाही. या संदर्भामध्ये यापूर्वीच आयुक्तांनी मान्य करूनही सर्व कामगार गेली पाच महिन्यापासून कामापासून वंचित आहेत. त्यांना पगारही देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे कायम कामगारांना एक पगार आणि 19 हजार रुपये एवढा बोनस देण्यात आला, तेवढाच बोनस सर्व कंत्राटी कामगारांना देण्यात यावा. ही मागणी मान्य करूनही अजून त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही. ईएसआयसी चे कार्ड अजूनही कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलेच नाही. या व अशा अनेक प्रश्नांसाठी मंगळवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पुणे मनपाच्या गेटवर हे सर्व कर्मचारी आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत कोणीही त्या जागेवरून उठणार नाही. असे ही शिंदे म्हणाले.