कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा
| माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी
पुणे | महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे किमान वेतनाप्रमाणे ठेकेदाराने वेतन देणे अपेक्षित आहे. या ठेकेदारांना महापालिकेच्या विविध विभागाकडून रक्कम देण्यात आली आहे. असे असतानाही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे 20 कोटी थकवलेले आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
डॉ धेंडे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेमधील विविध विभाग व खात्यांकडील पुणे महानगरपालिकेची कामे ठेकेदार पध्दतीने कंत्राटी कामगारांकडून केली जातात. यामध्ये विविध क्षेत्रीय कार्यालयामधील झाडण कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, आस्थापनेवरील कर्मचारी सुरक्षा विभागातील कर्मचारी, मोटार वाहन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाकडील कर्मचारी, पथ विभाग अशा अनेक विभागांमधील सन २०२२ मधील एप्रिल ते ऑक्टोंबर या कालावधीमधील ६५०० कामगारांचे वेतनापोटी, भविष्य निर्वाह निधी (E.P.F.) तसेच कर्मचारी विमा योजना (ESIC) पोटी जवळजवळ रक्कम २० कोटी या कर्मचाऱ्यांना अदा करणे बाकी आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे कि, विविध विभागातर्फे संबंधित ठेकेदारांना वेतनापोटीची रक्कम अदा केली नसेल तर त्यांना आदेश देवून सदरील रक्कम त्वरीत अदा करावी. जर विभागांकडून सदरील वेतनापोटीची रक्कम अदा करूनही ठेकेदारांनी रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली नाही तर आपण आपल्या खातेप्रमुखांना तात्काळ आदेश देवून दोषी ठेकेदारांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करावेत.
पुणे महानगरपालिकेच्या टेंडर पध्दतीमध्ये मनुष्यबळ पुरविणारे विविध ठेकेदार संस्था यांनी पुणे महानगरपालिकेला अंधारात ठेवून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या मेहनतीचा मेहनत नामा ठेकेदारांनी स्वतःची आर्थिक तिजोरी भरणेकरीता केला आहे. ही एक प्रकारे पुणे महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्यासारखे आहे. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून भविष्यामध्ये त्यांना पुणे महानगरपालिकेने मनपाचे कोणतेही काम देवू नये. व त्यांच्याकडून दंडासहित कामगारांच्या थकलेल्या पैशांची वसूली करून त्या कर्मचाऱ्यांना अदा करणेत यावे. असा आदेश लवकरात लवकर पारित करावा. अशी मागणी धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.