Encroachment Action | वाघोलीतील अतिक्रमणावर कारवाई
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पीएमआरडीएकडून कारवाईचा धडाका
PMRDA Pune – (The Karbhari News Service) – वाहतूक व्यवस्थेला अडचणीचे ठरणाऱ्या वाघोलीसह (Wagholi) परिसरातील अतिक्रमणावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) माध्यमातून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाने कारवाई केल्याने या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Pune News)
वाघोलीसह परिसरात अनधिकृत बांधकामे वाढत असल्याने याचा रहदारीस अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी होत्या. याची पीएमआरडीएच्या पथकाने दखल घेत घेत बुधवारी आणि गुरुवारी दुपारपर्यंत १२० पेक्षा अधिक रस्त्यावरील तात्पुरती अतिक्रमणे काढण्यात आली असून त्यांचे अंदाजे क्षेत्र १५ हजारपेक्षा अधिक चौ. फुट आहे. यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अधिकारी यांचेमार्फत यापुढे अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले. संबंधित कारवाई आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, नही आणि पीएमआरडीएच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता, पोलिस कर्मचारी यांनी पार पाडली.
तातडीने कारवाईचा संयुक्त बैठकीत निर्णय
एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, ग्रामपंचायत आदी विभागाच्या संयुक्त बैठक गुरुवारी (दि.३०) घेण्यात आली. यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून आठवडयाभरात निष्कासनाची कारवाईचा निर्णय बैठक घेण्यात आला. यात हिंजवडी ते मान, किरकीटवाडी ते कोल्हेवाडी शिवरस्ता दरम्यानची अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून संबंधितांनी आपली अतिक्रमणे स्वतः काढून घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
रहदारी सुरळीत करण्यावर भर
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरु आहे. यात गत काही दिवसात नवले ब्रिज भागातील 36 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली असून त्याचे क्षेत्रफळ अंदाजे 22 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आहे. यासह हिंजवडी लक्ष्मी चौकात नुकत्याच झालेल्या कारवाईत 100 पेक्षा अधिक अनाधिकृत बांधकामे पाडले असून त्याचे अंदाजे क्षेत्रफळ २० हजार ५०० चौ. फूट होते. नवले ब्रिज आणि लक्ष्मी चौकतील अतिक्रमणे निष्कासित केल्याने या भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत झाली.
COMMENTS