महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड
पुणे :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित राज असून, देशभरातील असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम काँग्रेस अंतर्गत या विभागामार्फत केले जाते.
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुणे येथील कामगार नेते सुनील शिंदे यांची आज नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉ उदित राज यांनी पाठवले आहे.
सुनील शिंदे हे गेली 30 वर्षे कामगार क्षेत्रामध्ये काम करीत असून संघटित व संघटित क्षेत्रातील अनेक कामगारांच्या समस्या यशस्वीरित्या सोडण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेषतः घरेलू कामगारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. बांधकाम मजूर, ऑटो रिक्षा, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळण्यासाठी अनेक आंदोलने ही त्यांनी केले आहेत व त्यात त्यांनाही अशी आले आहे. सध्या ते पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आज काँग्रेस भवन येथे कामगार मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री शिंदे यांचा सत्कार केला व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित राज, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की असंघटित कामगारांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी कोणताही कायदा नाही. अशा सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्यासाठी नवीन कायदा करण्यासाठी यापुढे कार्यरत राहणार आहे व महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांची मोठी चळवळ उभी करून त्यांना न्याय देण्याचे काम करण्यात येईल. असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनी केले. यावेळी विजय पांडव, मेघमाला वाघमारे, बाबा कांबळे, प्रदीप पांगारे, संतोष काटे, इत्यादी कामगार नेत्यांनी भाषणे केली.