डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते
समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जावे | चंद्रकांतदादा पाटील
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रसृष्टी’चा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. आज सकाळी ७.३० वाजता भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाजवळ शंकर शेठ रोड मिरा सोसायटी समोर हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
उद्घाटन प्रसंगी सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बोलताना माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीदिनी चित्रसृष्टीची कल्पना प्रत्यक्षात उतरविणे कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योग्य वाटेल त्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यांना पिण्यासाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी सत्याग्रह केला नाही, त्यांनी समाजातील लोकांच्या अडचणी, त्रास समजून घेऊन त्यांच्यासाठी पाण्याचा सत्याग्रह केला. डॉ. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत राहणं म्हणजे त्यांनी समाज शिकावा यासाठी प्रयत्न केला, समाजाचे प्रबोधन होईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा महापुरुषाने लोकांना शिकून संघटित होऊन मग संघर्षाची वाट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. आपण एकजुटीने डॉ. आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा मूलमंत्र आचरणात आणून त्या दिशेने वाटचाल करायला हवी. यावेळी उद्घाटनाला नगरसेवक अजय खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे, आरपीआयचे माजी शहर अध्यक्ष अशोकजी शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे दिनेश रासकर, विकी ढोले, मनीषा गायकवाड, नीता गायकवाड, युवराज अडसूळ उपस्थित होते.