येरवडा ते वाघोली दुमजली उड्डाणपुलाबाबत लवकरच निर्णय
| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
| आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष
नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येरवडा ते वाघोलीपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणासह सर्व संबधित विभागाच्या अधिकार्यांची लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पुण्यात विविध विकासकामांची आढावा बैठक घेतली. या बैठकित वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पुणे शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मांडला. प्रामुख्याने नगर रस्त्यावरील येरवडा ते वाघोली दरम्यान वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या माध्यमातून वाघोली ते शिरुरच्या दुमजली उड्डाणपूल आणि सहा पदरी रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत येरवडा ते वाघोलीपर्यंत सर्वाधिक वाहन कोंडी असते. त्यामुळे हा दुमजली उड्डाणपूल थेट येरवड्यापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी आमदार टिंगरे यांनी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडे याबाबत विचारणा केली. या अधिकार्यांनी महापालिका हद्दीतील रस्त्याबाबत पालिकेकडून प्रस्ताव येणे आवश्यक असून त्यासंबधीचा प्रस्ताव आला आहे. मात्र, त्यावर आता वरिष्ठपातळीवर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकर मुंबईत बैठकिचे आयोजन करण्याच्या सुचना संबधित अधिकार्यांना दिल्या. त्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या बैठकित गणेशोत्सव, तसेच कोरोना काळात नागरिकांवर, राजकिय कार्यकर्त्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर जे गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही केल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.