मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय : महापौर
– महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून मेट्रो अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांच्यात बैठक
पुणे: गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
: मध्यम मार्ग काढण्याचा एकमताने निर्णय
मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप गणेश मंडळ प्रतिनिधींनी घेतला होता. यावर महापौर मोहोळ यांनी सदरील काम तातडीने बंद करण्याचे निर्देश देत मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते आबा बागुल, मेट्रोचे अतुल गाडगीळ, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या विषयी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार आहे. त्या भागातील मेट्रो कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे.’
‘पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला उपस्थित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे’.
लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल.
यावेळी गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही परंपरा जपणे गरजेचे आहे व विकास देखील करणे गरजेचे आहे असे काँग्रेस गटनेते आबा बागूल म्हणाले. बैठकीतील सकारात्मक प्रतिसादामुळे गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला.
पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच असा विश्वास महापौर मोहोळ यांचे समवेत सर्व उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.
COMMENTS