नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस!
: उद्यापासून महापालिकेवर प्रशासक
पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal कॉर्पोरेशन) सभागृहाचा आज अखेरचा दिवस असणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा हा शेवटचा दिवस आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासक (Administrator) सुरू होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा (Online Meeting) होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.
: स्थायी समितीच्या बैठकीत काय होणार?
स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे. बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
: भाजप पुन्हा नको; शिवसेना करणार आंदोलन
दरम्यान शहर शिवसेना आज दुपारी महापालिकेत आंदोलन करणार आहे. भाजप पुन्हा नको रे बाबा, अशा पद्धतीच्या घोषणा शिवसेनेने तयार केल्या आहेत. तसेच पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार पथनाट्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
—
COMMENTS