चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?
– मोहन जोशी यांचा सवाल
पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता २६ जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ? प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा सवाल केला आहे.
जोशी म्हणाले, आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलदेखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !
जोशी पुढे म्हणाले, दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने पुण्याॉत मेट्रो प्रकल्प आणला. मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता २६ जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच, पुण्यातील ३३ किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.