वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.
कोविडच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाहनाऐवजी वाहतूक पोलिसांसोबत पुणे शहरात फिरुन वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला.
आजपासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. यादरम्यान भाविक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजा करतील. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसीय उत्सवाची सांगता 09 सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीच्या विसर्जनाने होणार आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या असून ढोल ताशांच्या गजराने वातावरण सुरमय झालं आहे पुणे शहराचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार हे निश्चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार झाली आहे. अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.