जात ही भूतबाधेसारखी..! – नागराज मंजुळे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार
पुणे – काही जण आपल्या जातीचा न्यूनगंड बाळगतात तर काहीजण माज बाळगतात, त्यामुळेच ही जात मला भूतबाधेप्रमाणे वाटते असे मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
मराठी आणि हिंदी दलित साहित्यावरील आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव आणि सरस्वती सन्मान व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दलित साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आला. विद्यापीठाचा हिंदी विभाग व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. त्यावेळी मंजुळे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. दत्ता मुरूमकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार रोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मंजुळे म्हणाले, पिस्तुल्या या शॉर्टफिल्ममध्ये जरा वेगळा विचार मांडताना सुरुवातीला भीती वाटली, मात्र महात्मा फुलेंच्या कवितेतील विचाराने मला बळ दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो या सगळ्यांचा प्रभाव केवळ, विद्यापीठ किंवा साहित्यपुरता मर्यादित न राहता आपल्या जगण्यावर पडायला हवा.
यावेळी डॉ. दत्ता मुरूमकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोहर जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन गीता शिंदे यांनी केले.
दलित साहित्य समजून घेण्यासाठी शिक्षकांनी जात बाजुला ठेवत शिकवायला हवे तर विद्यार्थ्यांनीही जात विसरून समजून घ्यायला हवे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून मी आज इथे पोहचू शकलो आहे. विद्यापीठाने माझा सत्कार केल्याबद्दल मी आभारी आहे.
डॉ. शरदकुमार लिंबाळे, लेखक
——
विविध प्रकारच्या साहित्यातून ज्या व्यथा समाजासमोर आल्यात त्या व्यथा पुढच्या पिढीला जाणवू नयेत ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही भावना रुजवत समाजातील या भिंती तोडत समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून करत आहोत.
COMMENTS