कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा
पुणे | खडकवासला प्रकल्पाची रबी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला होणार आहे. यामध्ये पाण्याच्या योग्य वापराबाबत चर्चा अपेक्षित आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सिंचन प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. माजी पालकमंत्री अजित पवार हे तत्काळ निर्णय घेण्याबाबत प्रसिद्ध होते. त्यामुळे बैठकीत वादळी चर्चा होत असत. भाजपचा अर्थात चंद्रकांत पाटील यांचा तसाच प्रयत्न असणार आहे.
नुकतेच पाटबंधारे विभागाने महापालिकेला दोन महिन्याचे १११ कोटींचे बिल दिले आहे. या वाढीव बिलावर आणि पाणी वापरावर या बैठकीत चर्चा होईल. कारण पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांचा वाद जुना आहे. दोन्ही संस्था आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे या बैठकीत कशी चर्चा होईल. याकडे लक्ष लागले आहे. शिवाय सिंचनासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत देखील बैठकीत चर्चा होईल.