कालवा सल्लागार समिती बैठक : खासदार गिरीश बापटांचा सभात्याग
: समान पाणी पुरवठा योजनेमुळे पुण्याला असमान पाणीपुरवठा
: महापालिका प्रशासनला देखील करावे लागले मान्य
पुणे : पुणे शहरात पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. सगळ्या धरणातून मुबलक पाणी मिळून देखील पुण्याला पाणी प्रश्न भेडसावत आहे. यावरून आजच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट यांना सभात्याग करावा लागला. तर महापालिका प्रशासनाने मान्य केले कि मुबलक पाणी मिळते आहे. मात्र समान पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहराला असमान पाणी मिळत आहे. यावरून तथा समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी शहराला समान पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
: गेल्या ४० वर्षात मी कधी सभात्याग केला? : गिरीश बापट
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट संतापलेले पाहायला मिळाले. बापट म्हणाले प्रशासनाला पळता भुई थोडी करू. सोडणार नाही कोणाला. आयुक्तांच्या घरी जाऊन त्याच्या घरात नळाला किती प्रेशरने पाणी येते त्याची पाहणी करणार. काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा ,कसबा ,नाना, नारायण पेठेत पाणी का नाही ? प्रशासनाचा गलथान कारभार खपवून घेणार नाही. प्रशासनाला वाटतंय , लोकप्रतिनिधी नाही ,आम्हाला रान मोकळ झालंय. ३ दिवसात पाणीपुरवठा सुधारला नाही तर आम्ही रस्त्यावर घेऊन येऊ नागरिकांना. मी ४० वर्षात कधी बैठकीतून सभात्याग केलाय, असा प्रश्न देखील खासदार बापट यांनी विचारला.
: प्रशासनाने दिली कबुली
खासदार बापट यांच्यासोबत आमदार चेतन तुपे यांनी देखील पाणी प्रश्नांवर तक्रार केली. तुपे यांनी भामा आसखेड मधून ज्यादा पाणी घेण्याची सूचना केली. त्यावर महापालिका आणि पाटबंधारे च्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिली. पाटबंधारे च्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि आम्ही पाणी कमी केले नाही. पालिकेला पर्याप्त पाणी मिळत आहे. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि धरणातून मुबलक पाणी मिळत आहे, मात्र समान पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे वितरण व्यवस्थेत त्रुटी निर्माण होत आहेत. त्यामुळे कमी पाणी मिळत आहे. लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल. असे आश्वासन यावेळी पालिका अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
: २४*७ योजनेवरून प्रधान सचिवानी देखील महापालिकेला टोकले होते
समान पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या ५ वर्षापासून सुरु आहे. मात्र तरीही योजनेचे काम पूर्ण झाले नाही. समान पाणी पुरवठा होण्याची गोष्ट तर दूरच आहे. दरम्यान नुकतेच राज्य सरकारने देखील पालिकेच्या या योजनेचे वाभाडे काढले होते. प्रधान सचिव महेश पाठक यांनी या योजनेवरून महापालिकेला टोकले होते. त्यामुळे आता तरी पालिका यात लक्ष घालणार का, हा प्रश्न निर्माण होत आहे.
: पुणे शहरात सर्वत्र समान पाणी मिळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार
खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन नवा मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. पुणे शहरातही महानगरपालिकेने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सर्वत्र समान पाणी मिळेल, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा २.५ टीएमसी पाणी कमी आहे, अशी माहिती बैठकीत यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी, परंतु सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.
पवार पुढे म्हणाले, भामा आसखेड प्रकल्पाचे पुणे शहरासाठी निश्चित केलेल्या पाण्यापैकी दैनंदिन सुमारे ७५ एमएलडी पाणी उचलले जात नाही. ते पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी पाईपलाईन, पंपींग स्टेशन आदी कामे गतीने पूर्ण करावीत, जेणेकरुन खडकवासला प्रकल्पावरील तेवढा ताण कमी होईल. महानगरपालिकेने १०० टक्के पाणी मीटर बसवणे, बेकायदेशीर नळजोड तोडण्यासह त्यावर कठोर कारवाई करणे यावर विशेष भर द्यावा. दक्षिण तसेच पूर्व पुणे भागात पाण्याच्या अडचणींबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घ्यावीत तसेच सुरू असलेली कामे गतीने आणि चांगला दर्जा राखून पूर्ण करावीत. नवीन पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन आदी कामे हाती घेताना ही कामे तुकडे (पॅकेजेस) करुन केल्यास एकाच वेळी कामे सुरू होऊन लवकर पूर्ण होतील, असेही पवार म्हणाले.
COMMENTS