Agriculture Awards | कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

HomeBreaking Newssocial

Agriculture Awards | कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Aug 13, 2022 11:59 AM

Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Compensationb to farmers | सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्वपूर्ण निर्णय
PM Kisan | EKYC | ‘पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे | महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती व पूरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेस देण्यात येणाऱ्या शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कारांसाठी कृषी विभागातर्फे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

कृषी विभागातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ( ७५ हजार रुपये), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ५० हजार रुपये), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, ५० हजार रुपये),  कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ५० हजार रुपये),  युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ३० हजार रुपये), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ३० हजार रुपये), उद्यान पंडीत पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी २५ हजार रुपये), सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग १ याप्रमाणे ६ असे एकूण ४० वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (प्रत्येकी ११ हजार रुपये) आणि आठ कृषी विभागातून प्रत्येकी १ अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे ८ तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरून एक असे एकूण ९ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार या नऊ पुरस्कारांसाठी २० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये १५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आली आहे व काही अंशी निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी पुणे विभागातून युवा शेतकरी पुरस्कार या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी, शेतकरी गट/संस्थांनी मार्गदर्शक सूचनेनुसार कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात २० ऑगस्ट पर्यंत सादर करावा. विविध कृषी पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्ष /तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.