Howard Scholar Dr. Suraj Engde | गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा – हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे

HomeपुणेBreaking News

Howard Scholar Dr. Suraj Engde | गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा – हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे

Ganesh Kumar Mule Apr 04, 2023 3:29 PM

Dr. Ambedkar Thoghts | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते
Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials
Dr Babasaheb Ambedkar Memorial | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकारच्या जागेसाठी धरणे आंदोलन | बिल्डरसोबतचा करार रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा – हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संगत आणि पंगत ही चांगल्या विचारांची असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांची संगत धरावी आणि विवेकी विचारांची सोबत ठेवावी. जाती-धर्माच्या चक्रव्यूहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असा कानमंत्र हॉवर्ड विद्यापीठातील स्कॉलर आणि समाज कल्याण विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी डॉ. सूरज एंगडे (Howard Scholar Dr. Suraj Engde) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘समता पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आज पुणे येथे शासकीय वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी श्री. एंगडे यांनी संवाद साधला. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते

श्री.एंगडे म्हणाले, विद्यार्थीदशेत संशोधन वृत्ती जोपासत शिक्षण आणि संशोधनाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कला, कृती, विचार व प्रश्न विचारण्याची सवय या गोष्टींनादेखील तितकेच महत्व द्यावे.

तंत्रज्ञानाचा उपयोग कौशल्य विकसित करण्यासाठी करावा, स्वतः उन्नती साधून इतरांनाही प्रगतीसाठी सहकार्य केल्यास कुटुंब व समाज घडेल. त्यातून विवेकवादी आदर्श निर्माण होतील असेही डॉ. एंगडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय पर्व अंतर्गत राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा परिपूर्ण वापर करून त्यातून नवसमाज घडवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, सहायक आयुक्त निशादेवी बंडगर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, गृहपाल, कर्मचारी तसेच पुणे शहरातील सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परदेशातील विद्यार्थ्यांशी डॉ. एंगडे यांचा संवाद

समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत असलेल्या जगातील विविध शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशीदेखील डॉ. सूरज एंगडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन व ज्या सामाजिक परिस्थितीतून आपण आलो त्या परिस्थितीची जाणीव ठेवून समाजाचे व देशाचे नाव कसे उज्वल होईल यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेले आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाला, शहराला, राज्याला व देशाला अभिमान वाटेल असे कार्य करावे व आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार येणाऱ्या काळात निश्चितच शिष्यवृत्ती योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार असल्याचे सांगितले.

या संवाद कार्यक्रमात चाळीस देशांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.