BJP Incoming | पृथ्वीराज सुतार, संजय भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश
Pune BJP – (The Karbhari News Service) ‘भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार जपतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्षात प्रवेश करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. भाजपमध्ये तुम्हाला कधीही सावत्र भावाकडे गेल्याचा अनुभव येणार नाही, तर सख्ख्या भावासारखी सन्मानाची वागणूक मिळेल,’ अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे स्वागत केले. (Prithviraj Sutar, Sanjay Bhosale in BJP)
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, माजी सभागृह नेते गणेश बिडकर व श्रीनाथ भिमाले यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘केंद्रात, राज्यात आणि पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन सरकारने विशेष विकासकामे आणि जनसेवेतून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यात विशेष विकासकामे होत आहेत, तर पक्षसंघटनेचा विस्तार होत आहे. त्याअंतर्गत हिंदुत्ववादी विचार आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध असलेले पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे स्वागत आहे,’ असे मोहोळ म्हणाले.
‘मी पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांच्यासमवेत सभागृहात एकत्रित काम केले असून, आमचा हिंदुत्वाचा धागा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्वाचा विचार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर विश्वास ठेवून या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांना आपुलकीचे स्थान मिळेल. आता हातात हात घालून आगामी पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे धीरज घाटे म्हणाले.
भाजप-शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचारावर झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशाला एकत्र आणले असून विकासाचा मोठा अजेंडा राबवला आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करताना अभिमान वाटत आहे, अशा भावना पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केल्या.
‘आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत होतो. मात्र, काँग्रेसने हा धर्म पाळला नाही. त्यामुळे आम्ही हिंदुत्ववादी विचारधारा जपणाऱ्या भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला,’ असे संजय भोसले म्हणाले.


COMMENTS