Baburao Chandere News | बाणेर-सूस-पाषाण वॉर्डात निवडणुकीचा पेच | बाबुराव चंदेरे यांचे नामांकन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वॉर्ड क्र. ९ (बाणेर-सूस-पाषाण) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चंदेरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करत, त्यांचे नामांकन रद्द करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश कळमकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. (Ganesh Kalamkar BJP)
गणेश कळमकर यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेनुसार, बाबुराव चंदेरे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची व मतदारांची दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चंदेरे यांच्यावर दोन गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले असून, यातील काही गुन्ह्यांसाठी २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.
कळमकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “शपथेवर खोटे बोलणे किंवा माहिती लपवणे हा केवळ तांत्रिक दोष नसून तो गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२९ नुसार खोटे पुरावे देणे हा दंडनीय अपराध आहे. यामुळे मतदारांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येते.”
….
ही याचिका कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून निवडणूक प्रक्रियेची शुचिता, पारदर्शकता आणि प्रामाणिकता टिकवून ठेवण्यासाठी आहे. खोट्या माहितीच्या आधारे कोणालाही लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत सहभागी होऊ दिले जाऊ नये.
– गणेश कळमकर, याचिकाकर्ते व उमेदवार

COMMENTS