उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण
महाराष्ट्राचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी जबाबदारीने काम करावे-अजित पवार
पुणे :- महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असून माध्यमांनी राज्याचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नवी पेठ येथील एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृहात पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर भावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कै. वरुणराज भिडे हे व्यासंगी, अभ्यासू, उत्तम पत्रकार म्हणून पुणे शहरासह महाराष्ट्रात परिचित आहेत. ते अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असत. राजकीय घराणी, सामाजिक व धार्मिक संघटनांचा अभ्यास आणि पाणी प्रश्न या विषयांवर त्यांचा मोठ्या प्रमाणात व्यासंग, अभ्यास असल्याने त्यांनी या विषयीचे भरपूर लेखन केले. राजकीय घराणी हा विषय राज्यात खूप मोठ्या प्रमाणात गाजला. सामाजिक व धार्मिक संघटनाविषयी केलेले भाष्य टोकदार आणि परखड होते. सर्व प्रकारच्या क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
महाराष्ट्राच्या पत्रकारितेला गौरवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्य चळवळीत राजकीय व सामाजिक भान निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी केले. सामाजिक परिवर्तनासाठी आणि लोकजागृतीचे महत्वाचे साधन म्हणून पत्रकारिता काळानुरुप वेगाने बदलत आहे. वृत्तपत्राची कागदावरील आवृत्ती ते संगणक, खिळे जुळविण्यापासून ते डिजीटल प्रिटींग आणि मुद्रीत माध्यम ते दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आत्ताच्या काळात दैनंदिन वापरला जाणारा समाज माध्यम असा प्रवास झालेला आहे.
मागील काही वर्षापासून माध्यमांचे स्वरुप बदलत चालले असून हा प्रवास मुद्रीत माध्यमांपासून ते आजच्या समाज माध्यमापर्यंत येवून पोहचला आहे. समाज माध्यमांनी संपूर्ण जग व्यापले आहे. सेकंदा-सेकंदाला अद्यावत माहिती पोचविण्याचे काम करताना हा वेग सर्वांना थक्क करणारा आहे. या वेगाशी जुळवून घेतल्यास स्पर्धेत टिकण्यास मदत होईल.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या हातात भ्रमणध्वनी, इंटरनेटची मोठी शक्ती आली आहे. समाज माध्यमांचा वापर सामान्य जनता करीत आहे. समाज माध्यम हे दुधारी हत्यार असून त्याचा वापर अंत्यत काळजीपूर्वक, सामाजिक भान ठेवून करावा. मुख्य प्रवाहातल्या संपादकांनी पुढाकार घेवून पत्रकारितेला योग्यप्रकारचे वळण लावण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसविण्याचे स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक अशा अनेक दिग्गज नेत्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. विकासाच्या बाबतीच वृत्तपत्रांनी विधायक सूचना मांडाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दै. लोकसत्ताचे संतोष प्रधान, महाराष्ट्र टाइम्सचे धमेंद्र कोरे, टाइम्स ऑफ इंडियांच्या अलका धुपकर, एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी (प्रतिनिधी मिकी घई) आणि सामनाच्या मेधा पुंडे -पालकर यांना कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार्थी निवड समितीतील परीक्षक पराग करंदीकर, मुंकुद संगोराम, अद्वैत मेहता व जयराम देसाई तसेच वृत्तपत्र परीक्षेत प्रथम क्रमांकाने उर्तीण झालेल्या रोहित वाळींबे आणि आतीत शेख यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.
किशोर राजे निंबाळकर यांना ‘एमपीएससी’चे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
COMMENTS
या कार्यक्रमाचे निमीत्ताने मी आययेएस किशोर राजे निंबाळकर एमपीएससीचे अध्यक्ष यांचे मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यकाळात त्यांनी अशीच वेगाने काम करावे अशा अपेक्षा व्यक्त करतो.
धन्यवाद.
विठ्ठल पवार राजे.
प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक.
शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य