Arvind Shinde | Pune News | महंमदवाडी परिसराचे नाव महादेव वाडी करण्यास अरविंद शिंदे यांचा विरोध | मुख्यमंत्र्याना दिले पत्र
Arvind Shinde | Pune News | पुणे- हडपसर (Hadapsar Pune) परिसरातील महंमदवाडी परिसराचे नाव महादेव वाडी करावे अशा आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) आणि पुण्यातील प्रमोद भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी केलेली मागणी भंपक प्रसिद्धीसाठी केलेली बेकायदा मागणी असून अगोदर त्यांनी महमदवाडी चा बकालपणा तेथील समस्या दूर कराव्यात. महापालिका प्रशासकीय काळात असला कायदेशिर तत्वांचा अवमान करू नये. अशी मागणी कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. देव,धर्म,जात ,पात असे नावे बदलणे यातून नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांच्या रोजगार, शिक्षण आणि मुलभूत गरजा आणि समस्या अगोदर सोडवा असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात अरविंद शिंदे यांनी असे म्हटले आहे कि पुणे शहर देशाचे आठवे महानगर म्हणून वेगाने उदयास येत आहे. पुणे शहर हे राज्याची सांस्कृतीक राजधानी, विद्येचे माहेरघर, औद्योगिक नगरी, संगणक नगरी म्हणून देशाला ज्ञात आहे. राज्याच्या व देशाच्या आर्थिक घडीत महत्वाचे स्थान असलेले पुरोगामी मानसिकतेचे शांतताप्रिय शहर ही पुण्याची देशाला ओळख आहे. शिवकालीन काळापासून विविध जाती-धर्माचे व १८ पगड जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने पुणे शहरात राहत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात व्यापक ठसा पुण्याने जगभरात उमटविला आहे.
महंमदवाडी परिसर पुण्यातील उच्चभ्रु तसेच मध्यमवर्गीय लोकसंख्येचा गुन्यागोविंदाने नांदणारा परिसर आहे. या परिसरात अल्पसंख्याक समाजाची देखील बहुसंख्य वस्ती आहे. या परिसराचे नाव शिवकालिक काळापासून महंमदवाडी असे असून स्थानिकांना अथवा संपूर्ण पुणे शहराल या परिसराचे नाव बदलण्यात अगर पुर्नरचना करण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नाही. मात्र कोकणातील महाडचे आमदार श्री. गोगावले यांनी पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक जीवनाशी सूताचाही संबध नसताना केवळ भंपक प्रसिध्दी व सनसनाटी मिळवून राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने ही मागणी केलेली आहे. मंत्री पदासाठी व पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आमदार गोगावले यांचा बेजबाबदार व कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करण्याचा उपद्व्याप नक्कीच हिन प्रवृत्तीचा आहे.
पुणे शहर हे देशातील महत्वाचे आर्थिक केंद्र असून वाढते शहरीकरण, बेसुमार नागरिकरण, अरूंद रस्ते, वाहतुक कोंडी, विस्कळीत पाणी पुरवठा, रखडलेले मल:निस्सरण प्रकल्प, महिला अत्याचार व गुन्हेगारीचे वाढलेले उच्चांकी प्रमाण, बेरोजगार यांनी ग्रासलेले आहे. सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून शहराचे मूलभुत प्रश्न सर्वोच्च प्राधान्याने सोडविणे ऐवजी शहराशी कोणताही दूरान्वये संबध नसलेल्या आमदार श्री. गोगावले यांच्या असंवेदनशिल मागणीस पाठबळ देणारी आपली भूमिका दुर्दैवी आहे. महाडचे आ. श्री. गोगावले यांनी पुणे शहराऐवजी त्यांच्या महाड विधानसभा मतदार संघातील परिसराचा विचार करावा. आ. श्री. गोगावले यांनी पुणे शहराच्या विकासात लुडबूड करण्याएवढी वेळ निश्चितच अजून आलेली नाही आणि भविष्यातही येणार नाही. अशा आक्षेपार्ह मागणीस राज्यसरकारने राजकीय फायद्यासाठी आशिर्वाद दिल्यास पुणे शहरातील अन्य भागातील राजकीय घटक देखील परिसराची नावे बदलण्याचा वादग्रस्त प्रघात सुरू करतील. राज्यात इतरत्र देखील हाच प्रकार सर्वत्र सुरू होऊ शकतो. जेणेकरून राज्यातील सार्वजनिक सलोखा बिघडू शकतो.
आमदार गोगावले यांच्या विषयाकिंत मागणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही तीव्र विरोध दर्शवित आहोत. कोकणातील महाडचे श्री. भरत गोगावले यांनी केलेली मागणी कायदेशिर निकषात बसत नसल्याने शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या अधिकारात सदर मागणीचे खंडन आपण करावे. सर्व सहमती व कायदेशिर तत्वांचा अवमान करून सदर मागणी प्रशासनाने पुढे रेटल्यास आम्ही रस्त्यावर येऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू व न्यायालयीन दाद मागू.