पुणे शहर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी अरविंद शिंदे
पुणे : काँग्रेसच्या नियमावलीनुसार रमेश बागवे यांनी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते. मात्र आता प्रभारी अध्यक्ष पदी अरविंद शिंदे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.
कॉंग्रेस हायकमांड च्या निर्णयानुसार ५ वर्ष पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्याना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसात यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात शहर अध्यक्ष पदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागून राहिले होते.
काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवले आहेत. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झाले होते.
पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
बागवे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत अरविंद शिंदे यांना प्रभारी अध्यक्ष पद दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अध्यक्षांची निवड होईल. ऑगस्ट महिन्यात पूर्ण वेळ नवीन अध्यक्ष मिळेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान 2003-04 साली देखील अशीच वेळ आली होती. संगीता देवकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निवडणुकीत अभय छाजेड यांनी बाजी मारली होती.
COMMENTS