अनंतराव पवार महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पुणे : जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी सकाळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी केले. प्रास्ताविकामधून त्यांनी महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर विकासाची वाटचाल नमूद केली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महत्त्वाचा ठरत असतो. यातूनच प्रेरणा घेत विद्यार्थी आपल्या भविष्याची वाटचाल करत असतो, असे मत प्रतिपादन केले.
दत्ता कोहिनकर आणि मकरंद टिल्लू यांनी आपल्या खुमासदार शैलीत तणावमुक्तीसाठी विविध प्रात्यक्षिके करत, हास्याचे फवारे उडवत उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांची साथ देत प्रतिसाद दिला. मकरंद टिल्लू यांनी आपल्या मनोगतातून पाणी गळती बंद करून पाणी बचत करण्याचे आवाहनही केले. उपकुलसचिव मुंजाजी रासवे म्हणाले की, अत्यंत ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली आहेत, या साधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत गेले पाहिजे. यापुढे ते म्हणाले की, आपण नेहमी आपल्या मनात चांगले विचार घेऊनच कार्यप्रवण राहिले पाहिजे. यावेळी महाविद्यालयात विविध विद्याशाखांमध्ये, विविध उपक्रमांमध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, प्रशासकीय सेवकांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी अंजनवेलचे संचालक राहुल जगताप यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. समारंभासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख आणि सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिनाली चव्हाण, डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले; तर डॉ. प्रवीण चोळके यांनी आभार मानले.
दत्ता कोहिनकर म्हणाले, आपण शरीर व मनाकडे लक्ष द्यावे. आपले अंतर्मन चोवीस तास कार्य करत आहे. यशस्वी जीवनासाठी जसा विचार कराल तशी कृती करणे महत्त्वाचे म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल.
मकरंद टिल्लू म्हणाले, व्यसन करायला लोक लाजत नाहीत; आपण हसायला का लाजावे, यामुळे तणावमुक्ती साधली जाते, माणूस एकमेव प्राणी आहे की तो विचारांचा रवंथ करतो, त्यामुळे यशस्वी होतो.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उप-कुलसचिव मुंजाजी रासवे, मकरंद टिल्लू (प्रसिद्ध लेखक, एकपात्री हास्य कलाकार, लाफ्टर योगा ट्रेनर), दत्ता कोहिनकर (माईंड पावर ट्रेनर) उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, सुनीलभाऊ चांदेरे (अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, मा. श्री. सुरज गोळे, मोहन गोळे, अंजनवेलचे संचालक राहुल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदमसाहेब, सहसचिव . एल. एम. पवार, खजिनदार मोहनराव देशमुख, सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
COMMENTS