Annasaheb Waghire College Otur | किशोरवयीन मुला-मुलींचे खरे मित्र हे आई-वडील | डॉ. अनुष्का शिंदे

HomeUncategorized

Annasaheb Waghire College Otur | किशोरवयीन मुला-मुलींचे खरे मित्र हे आई-वडील | डॉ. अनुष्का शिंदे

Ganesh Kumar Mule Jan 10, 2025 8:24 PM

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा
Annasaheb Waghire College : स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत : रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले विचार 
NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट

Annasaheb Waghire College Otur | किशोरवयीन मुला-मुलींचे खरे मित्र हे आई-वडील | डॉ. अनुष्का शिंदे

 

Pune News – (The Karbhari News Service) – मंगळवार रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिट्रसी” अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या अभिनव उपक्रमांतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर  ०७ जानेवारी ते १३ जानेवारी, २०२५ या कालावधीत तळेरान या ठिकाणी आयोजित केले आहे. शिबिरातील स्वयंसेवकांना प्रबोधन पर व्याख्यानमालेचे आयोजन करताना साईश्रद्धा होमिओपॅथिक क्लिनिक, नारायणगाव येथील डॉ. अनुष्का शिंदे यांचे “किशोरवयीन मुला- मुलींच्या समस्या” या विषयावर व्याख्यान आयोजित केल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे यांनी दिली.

डॉ अनुष्का शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात किशोरवयीन मुला- मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटणे हे स्वाभाविक असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैर असे काही नाही. विरुद्धलिंगी व्यक्ती विषयी आकर्षण हा निसर्गाचा एक नियम आहे. निसर्ग हा प्रजोत्पादनासाठी प्रत्येक प्राणी वर्गामध्ये थोड्या अधिक प्रमाणात कामभावना योग्य वयात येताना देत असतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचे म्हटले तर इस्ट्रोजेन हा स्त्राव लैंगिक अवयवांच्या ऊती आणि पुनरुत्पादनाशी संबंधित असून हाडे मजबूत करण्यासाठी देखील तो उपयुक्त आहे तर टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांच्या शरीराच्या वैशिष्ट्यांसाठी जबाबदार आहे. ज्यामुळे चेहरा आणि शरीरावर केसांची वाढ होते. पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या निर्मितीसाठी देखील हा स्राव गरजेचा आहे. स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन हा स्राव आढळून येतो. स्त्रियांच्या गर्भाशयातील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी फलित बिजांडाचे रोपण करण्यासाठी त्याचबरोबर स्तनांमध्ये दूध निर्मिती तयार करणे ही कार्ये हा स्राव करतो. हार्मोन्स या शब्दाला मराठीत संप्रेरक किंवा ग्रंथी असे म्हणतात. शरीराच्या विशिष्ट भागाला उत्तेजित करणे हे याचे कार्य आहे. या संप्रेरकामधील कमी जास्त बदल ही व्यक्तीच्या शरीरावर परिणाम करतात. मानवी शरीर हे पेशी आणि वेगवेगळ्या हार्मोन्स पासून बनलेले आहे. या हार्मोन्स मुळेच विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होते. या हार्मोन्सची निर्मिती ही सोळाव्या वर्षानंतर होते अलीकडच्या काळात ती किशोरवयीन मुलीं- मुलांमध्ये अगदी बाराव्या वर्षापासून देखील व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे या काळातील मुला-मुलींमध्ये शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक, लैंगिक आणि सामाजिक बदल झपाट्याने होत असतात. त्याचबरोबर याच काळात लैंगिक विकासाला सुरुवात देखील होते. मुलांमध्ये वृषण व मुलींमध्ये बीजांडकोष या प्रजनन ग्रंथांची वाढ होते. यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे शुक्राणू आणि स्त्री बीजाची निर्मिती करणे हे आहे. या कालखंडाच्या शेवटी मुला-मुलींचे किशोर अवस्थेतून तारुण्यवस्थेत रूपांतर होते आणि दोघेही प्रजननक्षम होतात.

या वयातील मुले-मुली स्वतःला शोधण्याचा, ओळखण्याचा, स्वतःचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी, स्वतःचा आत्मसन्मान राखण्यासाठी प्रयत्न करत असतात. मोठे होण्याची इच्छा, भविष्य नियोजन हे या कालखंडाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. त्याचबरोबर नाविन्याची ओढ, नवनिर्मितीची इच्छा यामुळे या वयातील मुले-मुली उत्साही, अस्वस्थ, अस्थिर, स्वप्नाळू अशी देखील असतात. या वयातील मुला मुलींना भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण, स्वतःच्या जननेंद्रियांचे व त्यांच्या कार्यांचे आकर्षण प्रचंड असते. त्यांना नवीन गोष्ट करून बघण्याची नवीन अनुभव घेण्याची तीव्र इच्छा असते. त्यामुळे या वयात मुले-मुली एकमेकांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. लैंगिकता ही माणसाची नैसर्गिक गरज आहे हे आपला समाज २१ व्या शतकात देखील खुलेपणाने मान्य करत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या समस्या निर्माण होतात. आजही लैंगिकते विषयी खुलेपणाने बोलले जात नाही किंवा विचारले जात नाही. कारण ते असभ्यतेचे लक्षण समजले जाते. यातूनच अनेक गैरसमज निर्माण होतात. यातूनच शारीरिक आकर्षणाला प्रेम समजणे, घरातून पळून जाऊन विवाह करणे, आई-वडिलांच्या मतांना विरोध करणे अशी बंडखोर प्रवृत्ती वाढीस लागते. म्हणून या काळात पालकांनी किशोरवयीन मुला-मुलींसोबत अतिशय निरोगी नातेसंबंध निर्माण केला पाहिजे. त्यांच्या वागण्यातील बदल जाणून घेतले पाहिजेत, मुला-मुलींच्या भावना आणि विचार यांचा आदर करून त्यावर चर्चा केली पाहिजे, किशोरवयीन मुला-मुलींच्या मनातील जिज्ञासा जाणून घेऊन त्याना वैज्ञानिक पद्धतीने शिक्षित केले पाहिजे, किशोरवयीन मुले -मुली आणि पालक यांच्यात निरोगी नातेसंबंध निर्माण झाला पाहिजे.

त्यामध्ये संवाद असला पाहिजे. त्यामुळे आपल्या समस्यांविषयी मुले-मुली पालकांशी मित्राप्रमाणे संवाद साधू शकतील. पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलांशी डेटिंग, लैंगिकता, ड्रग्स, अल्कोहोल, दारू इत्यादी सारख्या समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. त्यामुळे मुले-मुली कुतूहलापोटी चुकीची पाऊले उचलत नाहीत. पालकांनी जर संवादाचा वापर व्यवस्थित केला तर किशोरवयीन मुले-मुली आणि पालक यांच्यात एकमेकांविषयी विश्वास, आदर निर्माण होतो. अलीकडची पिढी ही एकविसाव्या शतकातली असल्यामुळे ही खूप जास्त टेक्नोसॅव्ही अशा प्रकारची आहे. त्यामुळे टीव्ही,संगणक, मोबाईल, इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आजच्या तरुणाईने मोबाईलच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. यासाठी मनाचा संयम हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या विकासासाठी आवश्यक तेवढा जर सोशल मीडियाचा वापर केला गेला तर नक्कीच सामाजिक, आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होईल. आजच्या तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असून पालकांनी या ऊर्जेला विधायक गोष्टींकडे वळवून आउटलेट उपलब्ध करून दिला पाहिजे. तरच डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवता येईल. किशोरवयीन मुला-मुलींनी या वयातील प्रेम म्हणजे “एक क्षण भाळण्याचा, बाकी सर्व क्षण हे सांभाळण्याचे” अशा प्रकारचे असते याची सातत्याने जाणीव ठेवावी. समाजामध्ये वावरताना व्यवहारिक ज्ञान व समाजाचे भान असणे अतिशय आवश्यक आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजेश रसाळ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनीलजी लंगडे, डॉ. रमाकांत कसपटे, विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोरजी उगले डॉ. विनायक कुंडलिक आदी प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे, डॉ.राजेंद्र आंबवणे, प्रा. सुवर्णा डुंबरे,डॉ. अविनाश रोकडे आणि किल्ले चावंड ग्रुप मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.