Ajit Pawar on Pune Metro | पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी मिळण्यात अजित पवारांच्या ‘पीएमयु’चंही मोठं योगदान
Pune Metro News – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत, 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) या दोन कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय पुण्याची वाहतूककोंडी सोडवण्यात, सार्वजनिक वाहतुकव्यवस्था सुधारण्यात, पुणे व परिसराच्या आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. (Pune News)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यालयातील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून पुण्यातील विकासप्रकल्पांसंदर्भात सातत्याने बैठका, आढावा घेऊन पुणे मेट्रोच्या विस्तारीत कामांना मंजूरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वणाज ते रामवाडी मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. आज मंजूरी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यात 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) ही दोन कामे मार्गी पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गिका उन्नत आणि 12.75 किलोमीटर लांबीच्या आहेत. या मार्गिकांवर 13 स्थानके असणार आहेत. या सेवेचा उपयोग प्रामुख्याने चांदणी चौक, बावधन, कोथरुड, खराडी, वाघोली उपनगरातील प्रवाशांना होणार आहे. पुण्यातील आयटी, व्यापारी, औद्योगिक विकासासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. यासाठी 3 हजार 626 कोटी 24 लाख रुपये (रु.3626.74) खर्च येणार असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आजही (ता.25) त्यांनी ‘पीएमयु’ची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
—-००००—
विस्तारित मार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी, यासाठी नुकतीच केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीत भेट घेत पाठपुरावा केला होता. त्याला आज यश आले आहे. पुणे शहर आणि परिसराच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असून मेट्रोचा शहराच्या सर्व भागात विस्तार करण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. पुण्याचा भौगोलिक विस्तार होत असताना सोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन निर्माण करणे, याकडे आपला कल आहे. नव्या दोन मार्गांमुळे पुणे शहराची पूर्व आणि पश्चिम ही दोन टोके मेट्रोने जोडली जाणार आहेत. एवढ्यावरच न थांबता नवीन मार्गांसंदर्भातही पाठपुरावा सुरू असून त्यालाही निश्चितच यश येईल ! पुण्याच्या विकासाच्या गतीत मेट्रो निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासह शहराचा आर्थिक विकासाचा सेतूही ठरेल हा विश्वास आहे.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री
———
“शहरातील सार्वजनिक वाहतुकीला गतिमान व पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पुणे मेट्रो हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी हे दोन्ही विस्तारीत मेट्रो मार्ग केंद्र सरकारने मंजूर केल्याची बातमी अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित होऊन पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता, वेळेची बचत आणि सुरक्षिततेचा मोठा फायदा होणार आहे.
वनाज ते चांदणी चौक मार्ग हा प्रचंड वाढत्या रहदारीसाठी दिलासा ठरणार असून, पुणेतील रामवाडी ते विठ्ठलवाडी मेट्रो मार्ग शहराच्या विस्तारलेल्या भागांना मुख्य नागरी भागांशी जोडणार आहे. विशेषतः वाघोली परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वसाहतींसाठी ही मेट्रो लाईफलाइन ठरणार आहे.
या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाची वेळेवर मिळालेली मान्यता ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाली. त्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील शहरांचा सर्वांगीण विकास वेग घेत आहे. पुणे मेट्रो प्रकल्प हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.
– माधुरी मिसाळ – नगर विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन
COMMENTS