राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात आंदोलन
महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करण्यासाठीच केंद्र सरकारने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नेमणूक केली आहे का ? असा संशय येऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे श्रीमान कोश्यारी सातत्याने आपल्या विधानांतून महाराष्ट्र आणि मराठी जनतेचा अवमान करीत आहेत. थेट केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यांना मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याची सुपारी दिली आहे का असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्यपालांच्या या बेताल वक्तव्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अलका चौकात निषेध करण्यात आला.
एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी ‘गुजरात, राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही,’ असे अतिशय संतापजनक आणि महाराष्ट्राच्या जनतेला हिनवणारे विधान केले आहे. जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबईचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रयत्नांतूनच मुंबई आर्थिक राजधानी होण्याकडे पाऊल पडले. याखेरीज लक्षावधी मजूर, कामगार, कष्टकरी जनतेने मुंबई घडविली, वाढविली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे शिंपण करुन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आहे. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे त्या हुतात्म्यांच्या हौतात्म्यांचा अवमान तर आहेच याशिवाय मजूर, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या श्रमाचा देखील राज्यपालांनी उपमर्द केला आहे.
प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करीत आले आहेत.यापुर्वीही त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अतिशय घाणेरड्या शब्दांत उल्लेख केला होता. कोश्यारी हे भाजपच्या मुशीत घडलेले नेते असल्याने ते आपल्या भाषणात जाणिवपूर्वक भाजपची स्क्रीप्ट वाचून दाखवितात की काय अशे वाटावे त्याप्रमाणे त्यांनी मुंबईविषयी प्रादेशिक वाद निर्माण करणारे वक्तव्य केले. अनावधानाने केलेले वक्तव्य समजू शकते पण कोश्यारी ‘हॅबीच्युअल ऑफेंडर’ असून त्यांना अशी विधाने करण्यात आनंद वाटतो. राज्यांराज्यांमधले संबंध हे सलोख्याचे असावेत यासाठी राज्यपाल व केंद्र सरकारने काम करणे आवश्यक असते. पण राज्यपाल वारंवार राज्यांराज्यांमधील संबंध बिघडविणारे विधान करीत असताना केंद्र सरकार आणि त्यांचा मातृपक्ष भाजपा देखील कसलाही हस्तक्षेप करीत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या सर्व नेत्यांनी,राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून महाराष्ट्राची माफी मागावी.महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांनी त्वरीत राजीनामा द्यावा किंवा केंद्र सरकारने त्यांना त्वरीत माघारी बोलावून घ्यावे. महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य असून पूर्वी पासूनच ह्या राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहत आले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीत सर्वच घटकांचा समावेश आहे. छत्रपती शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी चालणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या राज्यपालांनी महाराष्ट्राच्या आजवरच्या राज्यपालांची परंपरा व इतिहाचे निरपेक्षपणे अवलोकन करण्याची गरज आहे.”
यावेळी राजीनामा द्या राजीनामा द्या राज्यपाल राजीनामा द्या, मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव,गो बॅक गो बॅक राज्यपाल गो बॅक अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर आंदोलना साठी प्रवक्ते प्रदीप देशमुख ,बाळासाहेब बोडके वनराज आंदेकर , गणेश नलावडे, संतोष नांगरे , काका चव्हाण ,उदय महाले , लक्ष्मी खत्री, , रूपाली पाटील , संतोष हात्ते,श्रुती गायकवाड, प्रदिप भोसले, कुलदीप शर्मा ,स्वप्नील थोरवे, राहुल पायगुडे, स्वप्नील खडके व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.