पुणे महापालिकेत आघाडी हवी : जयंत पाटील
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जावे. त्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न असेल, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ही आमची भूमिका असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.
महापालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून सामोरे जावे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. शहर पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे, तर पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांनी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. असे असतानाच प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीदेखील शुक्रवारी आघाडीच्या बाजूने कौल दिला. पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘चांदिवाल आयोगाच्या समोर सचिन वाझे यांनी सांगितले होते, अनिल देशमुख यांची माझी कधी भेट झाली नाही. आता त्यांना कोणी मॅनेज करून बोलायला भाग पाडत असेल.’’
तर मागील आठवड्यात भाजपचे किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की झाली होती. यावर सोमय्या यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून हल्ला झाला होता, असे म्हटले होते. त्यावर पाटील म्हणाले ,‘‘सोमय्या यांना ‘सीआयएसएफ’चे संरक्षण आहे. त्यांना ‘सीआयएसएफ’ने संरक्षित केले पाहिजे होते. यात ते कमी पडले आहेत. मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत असे अजिबात नाही. त्याला महत्त्व देणे योग्य नाही. सत्ता नसल्याने भाजपचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे.’’ हिजाब प्रकरणावर पाटील म्हणाले, ‘‘भारतीय घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कुणाचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाहीत.’’
COMMENTS