सुमारे २०० वर्षानंतर तुळजाभवानी मातेची पालखी आणि पलंग गोरमाळेच्या प्रांगणात अवतरली!
| वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांचे विशेष प्रयत्न
ऑक्टोबर महिन्यातली प्रसन्न सकाळ उजाडली… सूर्याची कोवळी सूर्यकिरणे त्या छोट्याश्या गावावर पसरली… वातावरणात आपसूकच मनमोहकता आली… लुसलुशीत किरणे त्या गावावर पसरताना त्या ‘भास्कराला’ देखील विशेष आनंद वाटला असेल… तसे तर त्या गावची सकाळ दररोजच उजाडते.! मात्र मंगळवारची सकाळ विशेष होती … 200 वर्षानंतर उगवलेली ही सकाळ होती…त्यामुळे सूर्यकिरणासारखीच प्रसन्नता गावातील प्रत्येकाच्या मनात होती…! कारण सकाळी लवकर उठून आणि सडा संमार्जन करून, घरासमोर छान रांगोळी काढून आतुरतेनं फक्त वाट पाहायची होती…!
निमित्त होते बार्शी तालुक्यातील गोरमाळे गावात सुमारे 200 वर्षानंतर आगमन झालेल्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आणि पलंगाचे…! ‘दार उघड बये, दार उघड’ अशी मनाच्या अंतःकरणातून साद कैक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची जननी जिजाऊ मातेनं तुळजाभवानी मातेला घातली होती. तुळजाभवानी मातेने त्या आर्त सादेला प्रतिसाद दिला होता. स्वराज्य फळाला आलं होतं. अशीच मनःपूर्वक हाक गोरमाळे गावच्या लोकांनी 200 वर्षांपूर्वीची प्रथा पुन्हा सुरु करण्यासाठी घातली. गावकरी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने त्या हाकेला प्रतिसाद मिळाला आणि तुळजाभवानी मातेची पालखी आणि पलंगाचा गावात प्रवेश झाला…!
गावात सुरुवातीला पलंगाचे आगमन झाले. त्यानंतर दुपारी पालखीचे आगमन झाले. हा पलंग तुळजाभवानी देवीच्या निद्रेसाठी तयार केला जातो. नगर जिल्ह्यातील गणेश पलंगे आणि त्यांचा परिवार हा पलंग तयार करतात. नगर जिल्ह्यातून हा पलंग वेगवेगळ्या गावात थांबत तुळजापूरला येतो. तशाच पद्धतीने पालखी देखील वेगवेगळ्या टप्प्यावर थांबत तुळजापूरला जाते. ही पालखी नगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर मधील सागर भगत आणि त्यांचे कुटुंबीय तयार करतात. असे सांगितले जाते कि पालखी आणि पलंग एकत्र जात नाहीत. नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी त्यांची भेट होते, त्यांनतर तुळजापूरातच भेटतात. त्यामुळेच गोरमाळ्यात देखील आधी पलंग आणि त्यानंतर पालखीचा प्रवेश झाला. पलंग 2 तासपर्यंत गावात होता. पलंग गेल्यांनतर पालखीचे आगमन झाले.
याबाबत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखा अधिकारी आणि गोरमाळे गावचे सुपुत्र सिद्धेश्वर शिंदे यांनी ‘कारभारी’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, 200 वर्षांपूर्वी पालखी आणि पलंगाचे गोरमाळे गावात आगमन होत होते. मात्र ती प्रथा कालांतराने बंद झाली. याचे नेमके कारण कोणी सांगू शकत नाही. मात्र गोरमाळ्याचा तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघनाचा मान कायम आहे. त्यामुळे ही प्रथा पुन्हा चालू करण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानुसार मी ही कल्पना सचिन भगत यांना सांगितली. भगत यांनी देखील तात्काळ माझ्या विनंतीला मान दिला आणि पालखी आणि पलंग गावात आणण्याचे निश्चित झाले. शिंदे पुढे म्हणाले, पालखी जरी गावात आली आणि ती एका ठिकाणी ठेवली तर जास्त लोकांना आणि विशेष म्हणजे महिलाना दर्शनाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पालखीची गावातून मिरवणूक काढण्याची कल्पना मी सुचवली. यालाही भगत यांनी होकार दर्शवला. त्यानुसार गावात पालखीची चांगल्या पद्धतींने मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान पालखी आणि पलंगाचे गावात आगमन झाल्यामुळे गावात सकाळपासूनच लगबग होती. एका अर्थाने गावकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. गावातील सगळे लोक काम धाम सोडून फक्त दर्शनासाठी गावात थांबले होते. आसपासच्या गावातील लोकांना देखील याचा लाभ घेता आला. दरम्यान आता ही प्रथा अशीच सुरु राहणार आहे. तशी मान्यता देखील भगत आणि पलंगे परिवाराने दिली आहे. मात्र कुठेही गालबोट लागू नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहन देखील या परिवारांनी केले आहे.
पुरातन काळापासून गोरमाळे गावाला पालखी प्रदक्षिणेचा ‘मान’
तुळजाभवानी मातेच्या दरबारात विशेष मान असल्याने गोरमाळे ची ओळख सर्वदूर आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मातेच्या पालखीच्या शिडाला खांदा देण्याचा मान गोरमाळे गावातील लोकांना मिळतो. गावातील लोक देखील मिळालेल्या या संधीचे ‘सोनं’ करतात. वर्षानुवर्ष पासून हा ‘मान’ टिकवून गावातील लोकांनी आपली ‘शान’ जपली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानीमातेच्या पालखी प्रदक्षिणेचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोरमाळे गावाला मिळाला आहे. या दोन्ही गावांतील गावकऱ्यांना तुळजाभवानीमातेच्या दरबारात विशेष मान आहे. या दोन गावांना विशेष महत्त्व आहे. अहमदनगरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालखीचे या गावांतील मानकरी उत्साहात स्वागत करतात. नवरात्र महोत्सवादरम्यान दसऱ्याच्या दिवशी पहाटेच तुळजापूर येथील तुळजाभवानीमातेच्या मूर्तीची मंदिराभोवती पालखीमधून प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. या पालखीच्या पुढच्या शिडाला खांदा देण्याचा मान आगळगाव या गावाचा तर मागच्या शिडाला खांदा देण्याचा मान गोरमाळे गावाला मिळतो.
——–
200 वर्षांपूर्वी पालखी आणि पलंगाचे गोरमाळे गावात आगमन होत होते. मात्र ती प्रथा कालांतराने बंद झाली. याचे नेमके कारण कोणी सांगू शकत नाही. मात्र गोरमाळ्याचा तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघनाचा मान कायम आहे. त्यामुळे ही प्रथा पुन्हा चालू करण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानुसार मी ही कल्पना सचिन भगत यांना सांगितली. भगत यांनी देखील तात्काळ माझ्या विनंतीला मान दिला आणि पालखी आणि पलंग गावात आणण्याचे निश्चित झाले.
| सिद्धेश्वर शिंदे, वित्त व लेखा अधिकारी, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर