संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप म्हणजे या शतकातील महान विनोद!
गणेश बिडकर यांनी घेतला प्रशांत जगताप यांचा समाचार
पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याची संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपाच्या नेत्यावर संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप करणे, हा या शतकातील महान विनोद आहे. कोरोनामुळे मानसिक ताण अनेकांवर आलेला आहे, परंतु तो जगताप यांच्यावर अधिकच आलेला दिसतो, अशा शब्दात सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जगताप यांचा समाचार घेतला.
जगताप यांना अत्यंत परिश्रमानंतर, प्रतीक्षेनंतर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची वस्त्रे देण्यात आली आहेत. सुसंस्कृततेच्या नावाने बोंब असलेल्या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यामुळे चांगले काय बोलायचे, हे त्यांना उमजत नसल्याने विरोधकांवर बेलगाम आरोप करीत ते आपल्या पक्षाच्या संस्कृतीशी इमान राखत आहेत, असे बिडकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे दोन विद्यमान लोकप्रतिनिधी ‘मोका’ कायद्याखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेले
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही राजकारणी आणि गुन्हेगार संबंध असा विषय पुढे आल्यावर एकमुखाने कोणाचे नाव पुढे येते, याचा उच्चार करण्याची गरज नाही. गुन्हेगारांचे राजकारण्यांशी संबंध हा विषय काय, हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगत. त्यांच्या समकालीन नेत्यांशी बोलल्यास जगताप यांना खूप तपशिलाने माहिती मिळेल. नरसिंह राव पंतप्रधान असताना ‘व्होरा समिती’ने गुन्हेगार आणि राजकारणी संबंध यावर अहवाल तयार केला होता, तोही प्रशांत जगताप यांनी नजरेखालून घालावा. पुण्याचाच विचार करायचा तर राष्ट्रवादीचे दोन विद्यमान लोकप्रतिनिधी ‘मोका’ कायद्याखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेले आहेत. यातील एकाचे तर मार्गदर्शन सकाळ-संध्याकाळ जगताप घेत आहेत. त्यांना रोज बरोबर घेऊन फिरताना जगताप यांना कोणता संत्संग घडतो आहे, असा सवाल सभागृह नेते बिडकर यांनी विचारला आहे. जगताप यांच्या पक्षाचे गृहमंत्री या राज्याला लाभले होते, ते अनिल देशमुख १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणानंतर फरार आहेत. त्यांच्याविषयी जगतापांना काहीच बोलायचे नाही का? आपला पक्ष जनतेच्या मनातील सर्वात भ्रष्ट, गुंडांचा अशी प्रतिमा असताना जगताप जेव्हा संस्कृतीच्या गोष्टी करतात, तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करावेसे वाटते.
महिलांना समान संधी देण्यात राष्ट्रवादी अग्रेसर असल्याचा दावा केला जातो, पण दोन महिला चंद्रकांतदादांना आमदारकीची दोन वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने सदिच्छा द्यायला आल्याबरोबर त्या महिलांच्या बदनामीची मोहीम जगताप उघडतात, हे त्यांच्यातील पोकळ समतावादी दृष्टिकोनाचे दर्शन आहे. या महिलांचे भाऊ, पती काय करतात यावरून त्यांना बदनाम करणे, हा त्या महिलांवरील अन्याय आहे. या युगात महिलांना स्वतःची मते आहेत, स्वातंत्र्य आहे. असे असताना महिलांना केवळ त्यांच्या नातलग पुरुषांच्या प्रतिमेवरून जोखणे, हे महापौर राहिलेल्या जगताप यांना शोभत नाही. या महिलांना नव्याने काही सुरुवात करायची असेल, तर संधी नाकारणारे जगताप कोण? यातून जगताप यांचा महिलांप्रतिचा संकुचित दृष्टिकोन अधोरेखित होतो आहे. आधार देणारा, ज्याच्याकडे विश्वासाने जावे, अशा सहृदयी व्यक्तीला प्रेमाने ‘दादा’ या नावाने संबोधले जाते. चंद्रकांतदादांमधील दादा हा सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा दादा आहे. अन्यथा पुण्यातील जनतेला ‘दादा’ नावाची ओळख काय होती, हे तुम्हीच अधिक अधिकारवाणीने सांगू शकतात, असा टोला देखील बिडकर यांनी लगावला आहे.
COMMENTS