कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसंग्रामचे अध्यक्ष भारत लगड, शहर भाजप प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, किरण साळी, बाळासाहेब जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महायुतीचे हजारो कार्यकर्ते, गणपती मंडळ, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यापुर्वी रासने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रासने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नेहा कितवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
———-
विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ! | हेमंत रासने यांचा विश्वास
गेल्या वीस वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, सेवा कार्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला जनसंपर्क, महायुतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम संघटनात्मक फळी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा आणि कसब्यातील मतदारांचा दृढ विश्वास या बळावर विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.
रासने म्हणाले, मी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना आणि गणेश मंडळाच्या पूर्ण ताकदीसह ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू.