महापालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवणारा कनिष्ठ अभियंता निलंबित
| सामान्य प्रशासन विभागाची कारवाई
पुणे | सूरज पवार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून तूर्तातूर्त निलंबित करणेत आले आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेत पवार हे उमेदवारांना नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत होते. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
इथापे यांच्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सुरज पवार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा या ठिकाणी कार्यरत आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. सदर भरती प्रक्रीयेमधील उमेदवार यांना पवार हे पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे प्रलोभन दाखवून विविध उमेदवारांकडून पैश्यांची मागणी करीत आहे, असे निदर्शनास आले आहे. हे कृत्य हे वर्तणूक नियमाचे भंग करणारे व पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारे असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ५६ (२) (फ) अन्वये सुरज पवार, हुद्दा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा यांना दिनांक १९/१०/२०२२ पासून पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून अटी व शर्तीच्या अधिन राहून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान पवार त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. त्यामुळे पवार यांना निम्नस्वाक्षरीकर्ता यांचे पूर्व परवानगीशिवाय पुणे महानगरपालिका क्षेत्र सोडता येणार नाही. खातेनिहाय चौकशी करणेची कार्यवाही सहाय्यक आयुक्त, सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांनी तात्काळ सुरु करावयाची आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. असे आदेश ही इथापे यांनी दिले आहेत.
—-
अशा गैरकृत्य करणाऱ्यांना बळी पडू नये. अन्यथा सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल. असे आवाहन आहे.
– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग